Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha-सिंहस्थासाठी आणखी ३९६.६० कोटींचा निधी

शासनाच्या नगरविकास विभागाकडून आदेश जारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास व पायाभूत कामांसाठी राज्य शासनाने आणखी ३९६ कोटी ६० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे.

कुंभमेळ्याच्या कामांसाठी महापालिकेसह विविध शासकीय विभागांच्या कामांचा समावेश करून जिल्हा प्रशासनाने २४ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर केला होता. या आराखड्याला शासनाने थेट मंजुरी दिली नसली तरी सिंहस्थ प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार सिंहस्थ कामांना टप्प्याटप्प्याने मंजुरी तसेच निधीचे वितरण शासनाकडून केले जात आहे.

शासनाने नव्याने आदेश जारी करत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यामध्ये ३९१.५० कोटी रुपये वेतनाव्यतिरिक्त सहाय्य अनुदान तर ५.१० कोटी रुपये वेतनासाठी मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत विविध मंजूर विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहे

निधी खर्चासाठी शासनाच्या अटी

शासनाने निधी खर्चासाठी काही अटीही घातल्या आहेत. मंजूर निधी केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित अधिकृत कामांवरच खर्च करावा, संबंधित कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी वितरित करावा तसेच खर्चानंतर उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. या निधीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नाशिक विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आली आहे.

आतापर्यंत १८९७ कोटी मंजूर

यापूर्वीही शासनाने सिंहस्थ कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध टप्प्यांत २८३ कोटी, ७१७कोटी आणि ५०१.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ३९६.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण १८९७.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT