नाशिक : मुंबईनाका पोलिस ठाण्यात श्रमिक सेनेचे पदाधिकारी भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात टॅक्सी चालकाकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसात बाळासाहेब पाठक यांच्यावर हा दुसरा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील त्यांच्या अडचणी अजून वाढणार आहे. सध्या बाळासाहेब पाठक हा फरार असून पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे.
फिर्यादी संतोष अशोक भारूडकर (वय 30, व्यवसाय – टॅक्सी चालक, रा. नंदिनी नगर, भारतनगर, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2023 ते जुलै 2025 या कालावधीत व्दारका टॅक्सी स्टँड परिसरात आणि श्रमिक सेनेच्या कार्यालयात आरोपींनी जबरदस्तीने पैशांची मागणी केली.
आरोपी बाळासाहेब पाठक, तसेच त्यांचे सहकारी इप्पा भाई, आसिफ काद्री उर्फ आसिफ फायटर, आणि आबिद इस्माईल शेख उर्फ आबिद धोबी यांनी संगनमताने फिर्यादीकडून व्दारका ते कसारा या मार्गावर टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 हजार रुपये घेतले. अपघातामुळे फिर्यादीने काही काळ टॅक्सी बंद ठेवली असता, आरोपींनी त्याची टॅक्सी व्यवसायाची संधी त्यांच्या साथीदारास दिली.
फिर्यादी पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेल्यावर आरोपींनी पुन्हा 70 हजार रुपयांची मागणी केली तसेच प्रत्येक ट्रिपमागे 100 रुपये देण्याची अट घातली. मात्र, ही रक्कम न दिल्याने आरोपींनी त्याच्यावर मारहाण, शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नोंदविण्यात आले आहे.
या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२३ भा.दं.वि. कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(४), ३०८(५), ३५२, ३५१(२), ११५(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. वाघ या घटनेचा तपास करीत आहे.
बाळासाहेब पाठक अजूनही फरार
म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये 57 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणीचा गुन्हा सुद्धा बाळासाहेब पाठक मामा राजवाडे यांच्यावर दाखल झालेला आहे. या प्रकरणांमध्ये मामा राजवाडे हा सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे तर पाठक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे