नाशिक : विकास गामणे
प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पाणीपुरवठा करणे अपेक्षित असते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागातील १५ तालुक्यांतून २६ ग्रामपंचायतींकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
ग्रामपंचायतींनी पाणी नमुन्यात क्लोरीनचा २० टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचे निर्देशनास आले. क्लोरीनचा कमी वापर केल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे, तर तपासणी केलेल्या ३ हजार ९२४ नमुन्यांपैकी ८७ जलस्रोतांचे (२ टक्के) पाणी दूषित आढळले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. या तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरिता जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात. पाणी शुद्धीकरण करताना यात, क्लोरीन वापराचे प्रमाण ३३ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र, ३३ टक्यांपेक्षा कमी क्लोरीनचा वापर केल्यास ते पाणी शुद्धीकरण योग्य पद्धतीने केले जात नाही, असा निष्कर्ष काढण्यात येतो. जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर दूषित नमुन्यांबाबत आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार, दूषित पाण्याच्या ४०० नमुन्यांत २६ नमुन्यांत, संबंधित ग्रामपंचायतींनी क्लोरीनचा वापर २० टक्क्यांपेक्षा कमी केला असल्याचे समोर आले आहे. या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना नोटिसा बजावून, तत्काळ पाणी शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२५ च्या अहवालानुसार ३ हजार ९२४ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी ८७ गावांचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे.
सुरगाणा, सिन्नर, कळवण (प्रत्येकी ५ टक्के), देवळा व नांदगाव (प्रत्येकी ४ टक्के), चांदवड, दिंडोरी, येवला, मालेगाव (प्रत्येकी ३ टक्के), निफाड (२ टक्के), पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी (प्रत्येकी १ टक्का).
पिंप्राळे, नांदूर, क्रांतिनगर, कुसुमवेल, लोधरा, बोलठाण (ता. नांदगाव), अनकाई, अंगुलगाव, देवठाण, आड सुरेगाव, भुलेगाव (ता. येवला), बहादुरी, शिंगवे, वागदर्डी (चांदवड), जायखेडा, कपालेश्वर आश्रमशाळा , बिजोरसे (बागलाण), बेलू, सोनवगिरी, जोगल टेंभी, (सिन्नर), लेंडाणे, खडकी, वडगाव (मालेगाव), हट्टी, लाडगाव (सुरगाणा), जयदर (कळवण)
एखाद्या गावातील ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोक दूषित पाणी पित असतील, तर अशा ग्रामपंचायतींना तीव्र जोखमीचे गाव समजले जाते. त्यांना रेडकार्ड दिले जाते. त्यात एकही ग्रामपंचायत नाही. ३१ ते ६० टक्के नागरिक दूषित पाणी पित असतील, तर मध्यम जोखमीचे गाव मानले जाते. अशा ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. अशा २७ ग्रामपंचायती आहेत. ० ते ३० टक्के लोक दूषित असल्यास अशी गावे सौम्य जोखीम या गटात मोडतात. त्यांना हिरवे कार्ड दिले जाते. जिल्ह्यात अशा १ हजार ३५७ ग्रामपंचायती आहेत.