4 former Sena (UBT) corporators from Nashik join Eknath Shinde-led Sena
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शंभर प्लसचा नारा देत मोठे प्रवेश घडवून आणल्यानंतर शिवसेना शिंदे गटही मागे राहिलेला नाही. शिंदे गटानेदेखील चार माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणत उबाठाला धक्का दिला आहे. माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, किरण गामणे- दराडे, पुंडलिक अरिंगळे, सीमा निगळ यांनी उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांचे वारे जोमाने वाहत आहेत. भाजपने शंभर प्लसचा नारा दिला असून, त्यादृष्टीने विजयाची खात्री असलेल्या अन्य पक्षांतील पदाधिकारी, माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष प्रवेशावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. त्यातूनच मंगळवारी उबाठाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश सोहळा होत असताना शिंदे गटानेही भाजपच्या प्रवेश सोहळ्याआधी चार माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणत भाजपपेक्षा आपण कमी नसल्याचे दाखवून दिले. मुंबईतील मुक्तगिरी बंगला येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, खासदार नरेश म्हस्के माजी खासदार हेमंत गोडसे आधी उपस्थित होते. माजी नगरसेवकांसह गोकुळ निगळ, अभिषेक निगळ यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला.
महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सीमा निगळ, किरण गामणे-दराडे व पुंजाराम गामणे, पुंडलिक अरिंगळे या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेच्या उबाठा गटाला जबरदस्त धक्का दिला. सोबतच पुढील आठवड्यात शिवसेनेच्या उबाठा गटातील काही बडे नेते शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य राजकीय पक्षांतून शिवसेना (शिंदे गटात) प्रवेशासाठी मोठी रिघ लागली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद विरोधकांना दिसून येईल.- अजय बोरस्ते, उपनेते, शिंदे गट