Uddhav Thackeray  
नाशिक

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांची 'मातोश्री'वर धाव; फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देत एकनिष्ठतेची ग्वाही

Uddhav Thackeray | 'आम्ही ठाकरेंसोबतच!' पाऊण तास चर्चा: 'मातोश्री'वर नगरसेवकांची एकनिष्ठतेची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना बुधवारी (दि. १५) 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करून सुमारे पाऊण तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली, तर ठाकरे यांनीही संयम राखत पक्षाची साथ सोडू नका, असा स्पष्ट संदेश दिला. बैठकीला जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, गटनेते केशव पोरजे यांच्यासह १५ पैकी १४ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेविका मंगला आढाव प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने पुत्र रोशन आढाव बैठकीला उपस्थित होते.

पक्षाचे नेते रवींद्र मिर्लेकर व खासदार विनायक राऊत हेही बैठकीला उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील १२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत गटनेते केशव पोरजे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी, 'आमी पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहोत. एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडली.

प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्र संवाद साधून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत काही मध्यस्थांकडून नगरसेवकांशी संपर्क साधून पक्षांतरासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

१० नगरसेवक सोबत आणल्यास उपमहापौरपदासह प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आमिष दाखविले जात असल्याची माहिती नगरसेवकांनी ठाकरे यांच्यासमोर मांडली. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला दिला.

विकासनिधीतील दुजाभावाचा मुद्दाही चर्चेत

महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवक असल्यामुळे भाजप-शिंदे सत्ताधाऱ्यांकडून प्रभागातील विकासकामांसाठी समान निधी दिला जात नसल्याची तक्रारही नगरसेवकांनी बैठकीत केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी विकासनिधी हा जनतेचा अधिकार असल्याचे सांगत, समान वागणुकीसाठी आवश्यक असेल तर न्यायालयातही जा. कायदेशीर लढ्यात तुमचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सिंहस्थ कामांवर लक्ष ठेवण्याचे आदेश

राजकीय घडामोडींबरोबरच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. शहरात सुरू असलेल्या सिंहस्थ विकासकामांबाबत नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची चिंता व्यक्त केली. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया जाऊ नये, यासाठी प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवा. गरज भासल्यास आंदोलन करा; मात्र नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी नगरसेवकांना दिले.

'वाईट काळ कायमचा नसतो'

नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचे आवाहन केले. 'एकनिष्ठतेचे फळ नक्कीच मिळेल. पक्षाचा सध्याचा प्रतिकूल काळ लवकरच संपेल. चांगले दिवस पुन्हा येतील. कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेशी असलेली बांधिलकी कायम ठेवावी,' अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांचे मनोबल वाढविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT