नाशिक : नृत्योत्सवात भारतीय आणि जपानी कलाकारांच्या शास्त्रीय मिलाप साकारला 
नाशिक

Nashik- नाशिकच्या शिवालय नृत्य कलामंदिरातर्फे नृत्योत्सव

Shivalaya Nritya Kalamandir Nrityotsav in Nashik-शास्त्रीय नृत्यातून दोन संस्कृतींचा आध्यात्मिक मिलाप; भारत-जपान मैत्रीचा नवा सेतू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक येथील शिवालय नृत्य कलामंदिर आणि विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र यांच्याकडून भारत आणि जपान या दोन संस्कृतीसमृद्ध देशांमधील मैत्रीचा नवा सेतू उभारणारा अनोखा भारत-जपान नृत्योत्सव आंतरराष्ट्रीय केंद्र, पाषाण (पुणे) येथे रंगला. भारतीय आणि जपानी शास्त्रीय नृत्यपरंपरांचा सुरेख संगम घडविणाऱ्या या नृत्यसंध्येला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थांच्या संस्थापिका व प्रेरणास्थान कै. मयंती मगरे, पद्मभूषण डॉ. कनक रेळे आणि श्री नटराज यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे गौतम कुलकर्णी, योगिता कुलकर्णी, संस्थापक-अध्यक्ष प्रा. दीपक मगरे आणि डॉ. स्वाती दातार यांच्या हस्ते झाले. नाशिकच्या प्रथम महिला पुरोहित आणि भजनसम्राज्ञी स्मिता आपटे यांनी शांतीसूक्तातील वैदिक मंत्रांचा जप करून विश्वशांती तसेच भारत-जपान मैत्रीचे संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.

बंगळुरूचे डॉ. लक्ष्मीनारायण जेना यांनी 'अर्पणम' या शीर्षकाखाली कथक नृत्य भारत-जपान मैत्रीला आणि माता-गुरुमाता यांच्या स्मृतींना अर्पण केले. 'डमरू हर-कर बाजे...' या धृपदाचे राग गुणकली आणि चौदा मात्रांच्या धमार तालातील वेगवान सादरीकरण त्यांनी केले. त्यानंतर संत चोखामेळा यांच्या रचनेवर आधारित 'अभंग' अवीर भैरव रागात सादर केला. विठ्ठलनामाचा गजर सभागृहात घुमल्याने वातावरण भक्तिमय झाले.

या भारतीय आणि जपानी कलाकारांच्या शास्त्रीय नृत्यसाधनेचा परिचय करून देणाऱ्या नृत्यसंध्येतून दोन्ही संस्कृतींचा आध्यात्मिक आणि कलात्मक मिलाप अनुभवायला मिळाला. नाशिकच्या शिवालय नृत्य कलामंदिराच्या पुढाकारातून साकारलेल्या उपक्रमामुळे भारत-जपान सांस्कृतिक मैत्रीला नवा आयाम मिळाला. भारतीय आणि जपानी नृत्यकलाकारांचे अप्रतिम सादरीकरण पाहून रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

जपानी कलाकाराकडून गणेशवंदना

नृत्योत्सवाचे उ‌द्घाटन जपानमधील गिफू शहराच्या साची तात्सुमी यांच्या भरतनाट्यम्‌ने झाले. संत तुलसीदासांच्या 'गाइये गणपती...' या भजनाच्या आधारे त्यांनी गणेशाचे दैवी रूप साकारले. साची तात्सुमी या गुरू पद्मभूषण प्रा. सी. व्ही. चंद्रशेखर यांच्या पट्टशिष्या असल्याची प्रचिती त्यांच्या नृत्यातून आली. जपानी संस्कृतीत गणेशाला 'कांगीतेन' किंवा 'शोतेन' या नावाने ओळखले जाते. तेथे गणेशाचे द्विमुखी रूप प्रचलित असून एका मुखात शिवाचे, तर दुसऱ्या मुखात पार्वतीचे प्रतीक मानले जाते.

वैविध्यपूर्ण सादरीकरण

पुण्यातील ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरू डॉ. स्वाती दातार यांच्या १२ शिष्यांनी 'गणपतीतालनम्', 'चरिष्णू' आणि 'रामभजन' या रचनांचे सादरीकरण केले. नृत्यातील गती, वेगवान हालचाली, प्रवाहीत्व आणि लय यांची प्रभावी मांडणी करत त्यांनी विष्णुरूप श्रीराम तसेच दशावतारांचे सुरेख वर्णन नृत्याभिनयातून केले. शिस्तबद्ध अध्यापनाची छाप त्यांच्या सादरीकरणातून जाणवली.

ओडिसीतून कृष्ण-राधेचा भावबंध

जपानमधील नारा शहराच्या काओरी नाका यांनी ओडिसी नृत्यशैलीतील पल्लवीने सादरीकरणाची सुरुवात केली. राग वज्रकांती आणि एकतालावर आधारित रचना संथ पदन्यासापासून मध्य व द्रुतलयीत नेण्याचे कौशल्य रसिकांना भावले. 'मुहा मुही किशोरों' या ओडिया पदातून त्यांनी कृष्ण आणि राधेच्या पहिल्या भेटीचा प्रसंग नाट्यशास्त्रीय अभिनयातून जिवंत केला. राग बागेश्री आणि जाती तालातील या रचनेत त्यांचा अभिनय विशेष उठून दिसला. अखेरीस 'शिवाष्टक' या भक्तिपूर्ण रचनेत शिवाचे संहारतांडव आणि आनंदतांडव या दोन्ही रूपांचा उत्कट अभिनयातून मिलाप साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT