नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय आस्थापनांना सार्वजनिक सुटी असल्यामुळे प्रवाशांची रोडावणारी संख्या लक्षात घेता बुधवारी (दि. १९) सिटीलिंकच्या बसेस कमी क्षमतेने धावणार आहेत. त्याचप्रमाणे पोलिस वाहतूक शाखेच्या सूचनांनुसार सिटीलिंकच्या काही मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून पास केंद्रही बंद राहणार असल्याचे सिटीलिंक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
सालाबादाप्रमाणे यंदाही नाशिकमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गांवर भव्य देखावे सादर केले जाणार असून बुधवारी शहरातील विविध भागांतून जयंती मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक मार्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीकरिता बंद करण्यात आलेले आहेत. अशा मार्गांवरील सिटीलिंकच्या बसेस अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनाने ऐनवेळी दिलेल्या सूचनांनुसारही मार्गात बदल होऊ शकतात. नवीन सीबीएस येथून सुटणाऱ्या सर्व बसेस या निमाणी बसस्थानकातून सुटतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. तसेच प्रवास करण्यापूर्वीच प्रवाशांनी संपूर्ण बसफेरीची माहिती घेऊनच प्रवास करावा. बुधवारी सिटीलिंकचे सर्व पास केंद्रदेखील बंद राहणार आहेत. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवास करतेवेळी प्रवाशांनी कोणतीही समस्या असल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.