ठळक मुद्दे
शिंदे सेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसवेक; महाविकास आघाडीचा सुपडासाफ, काँग्रेसला केवळ एक जागा
सटाणा, त्र्यंबकेश्वरमध्ये शिंदे सेनेचा भाजपचा धक्का; कोकटेंचे मंत्रीपद जाऊनही राखला सिन्नरचा गड
नांदगाव, मनमाडला कांदेंचा बोलबाला, येवल्यात भुजबळच हेवीवेट; आमदार बनकरांच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ
नाशिक : महायुतीतील भाजप व शिंदे शिवसेना यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने ५ नगरपरिषदांवर भगवा फडकवत वर्चस्व मिळवले आहे. भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन - तीन नगरपरिषदांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडासाफ झाला आहे. नगरसेवकांच्या २६४ जागांपैकी शिंदे शिवसेनेने सर्वाधिक ८५ जागांवर विजय मिळवला. याखालोखाल भाजप ६९, अजित पवार राष्ट्रवादीने ६३, उबाठा शिवसेना २७, शरद पवार गटास ३ तर, काँग्रेस केवळ एका जागी विजयी झाला. यात १६ अपक्षांची लाॅटरी लागली.
नांदगाव व मनमाड नगरपरिषदेत आमदार सुहास कांदे यांचा बोलबाला दिसला. मंत्री छगन भुजबळांचा धुव्वा उडाला. सटाण्यात भाजपमधील गटबाजी शिंदे शिवसेनेच्या पथ्यावर पडली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रतिष्ठेची केलेली त्र्यंबकेश्वरच्या निवडणुकीत भाजपला फाजील आत्मविश्वास नडला. याचा फायदा शिंदे शिवसेनेला झाला. इगतपुरी व सिन्नरमध्ये भाजपने फोडाफोडी करुनही भाजप तोंडावर आपटली. त्र्यंबकेश्वरला शिंदे शिवसेनेने अजित पवारांच्या साथीने बाजी मारली. दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांची २५ वर्षांची भगूर नगरपरिषदेतीस सत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उधळून लावली. सिन्नरमध्ये माजीमंत्री माणिकराव कोकाटेंनी गड कायम राखला.
येवल्यात मंत्री भुजबळ यांनी दराडे बंधूना धोबीपछाड देत हेवीवेट असल्याचे दाखवून दिले. आमदार दिलीप बनकर यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळगाव व ओझर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले. त्यामुळे बनकरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. चांदवडमध्ये भाजपने आपला गड राखण्यात यश मिळवले. या निवडणुकीत महायुतीचा बोलबोला दिसून आला. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी रविवारी (दि.२१) मतमोजणी झाली. यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नांदगाव, मनमाड व सटाणा या पाच नगरपरिषदांत शिंदे शिवसेनेने यश मिळवले. सत्ताधारी भाजपने चांदवडचा गड कायम राखला. नव्याने झालेल्या ओझर व पिंपळगाव बसवंत नगरपरिषद ताब्यात घेतल्या. भगूर, सिन्नर व येवला नगरपरिषदेत राष्ट्रवादीने विजय मिळवला.
नगरपरिषदनिहाय पक्षानिहाय विजयी उमेदवार
शिंदे शिवसेना
त्र्यंबकेश्वर : त्रिवेणी तुंगार
इगतपुरी : शालिनी खताळे
मनमाड : बबलू पाटील
नांदगाव : सागर हिरे
सटाणा : हर्षदा पाटील
भाजप
पिंपळगाव बसवंत : डॉ. मनोज बर्डे
ओझर : अनिता घेगडमल
चांदवड : वैभव बागुल
राष्ट्रवादी अजित पवार गट
भगूर : प्रेरणा बलकवडे
सिन्नर : विट्ठलराजे उगले
येवला : राजेंद्र लोणारी
भाजप 14 तर शिंदे शिवसेना 12 जागांवर विजयी; नाशिक जिल्ह्यात शिंदे सेनेची सरशी
नाशिक : नगरपरिषदांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षच सर्वांत मोठा पक्ष ठरला असून भाजपने 14 नगरपरिषदांवर वर्चस्व मिळविले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 12 ठिकाणी सत्ता हस्तगत केली आहे. पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गट सहा ठिकाणी सत्ता मिळवून तिसऱ्यास्थानी आहे.
नाशिक जिल्ह्यातील ११ नगपरिषदांची निवडणूक सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, येथे शिंदे शिवसेनेने भाजपला छोबीपडाछ देत ११ पैकी तब्बल ५ नगरपरिषदा ताब्यात घेतल्या आहेत. अजित पवार गट व भाजला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या. जळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक 8 ठिकाणी, शिंदे सेना 6, उद्धव सेनेला 2 तर राष्ट्रवादी आणि अपक्षाकडे प्रत्येक एक नगरपरिषद गेली आहे. धुळे जिल्ह्यात चार पैकी 3 ठिकाणी भाजप तर एका नगरपरिषदेवर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने सत्ता मिळविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन ठिकाणी तर शिवसेना शिंदे गट एक तर अपक्षाकडे एका नगरपरिषदेची सत्ता गेली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकाही नगरपरिष कॉंग्रेसला राखता आलेली नाही.