नाशिक : शिवस्वराज्य यात्रा नियोजन बैठकप्रसंगी मार्गदर्शन करताना गजानन शेलार. समवेत नाना महाले, गोकुळ पिंगळे, मुन्ना अन्सारी, छबू नागरे, अनिता दामले आदी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Politics | शरद पवार गट फुंकणार विधानसभेचे रणशिंग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा सोमवारी (दि. २३) नाशिकमध्ये दाखल होणार आहे. यावेळी पवार गट निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. संपूर्ण ताकदीनिशी यात्रा यशस्वी करण्याचा निर्धार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणूक अनुषंगाने वातावरणनिर्मितीसाठी शरदचंद्र पवार गटातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमधून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा सोमवारी धुळेमार्गे नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मेहबूब शेख आदी नेते उपस्थित राहणार आहेत. तीनदिवसीय यात्रेत पहिल्या दिवशी सटाणा येथे सभा होईल. त्यानंतर आडगाव येथून नाशिक शहरात यात्रेचे आगमन होईल. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा पार पडेल.

दरम्यान, पक्षाच्या मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात गुरुवारी (दि. १९) बैठक पार पडली. पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार व प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत स्थानिक प्रमुख नेते, विभागीय अध्यक्ष, युवक व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय हा राज्यपातळीवर होणार आहे. पण, पक्षाची यात्रा संपूर्ण ताकद लावून यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीला ज्येष्ठ नेते नाना महाले, छबू नागरे, डी. वाय. पगारे, मुन्ना अन्सारी, अनिता दामले, जगदीश गाेडसे, संजय कुऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यमान जागांवर लक्ष

पक्षाच्या जिल्ह्यातील सहा विद्यमान जागांबरोबर बागलाण व चांदवड या जागांसाठी शरद पवार गट आग्रही आहे. दोनदिवसीय यात्रेवेळी पक्षाचे प्रमुख नेते या मतदारसंघात जाऊन तेथील स्थानिकांशी संवाद साधतील. मंगळवारी (दि. २४) दिंडोरी व येवल्यात सभा, चांदवडला शेतकरी मेळावा पार पडणार आहे. तर बुधवारी (दि. २५) देवळाली व सिन्नरला सभेचे आयोजन केले आहे. दरम्यान, नाशिकच्या मेळाव्यात प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT