Shalarth ID Scam 
नाशिक

Shalarth ID Scam | 160 कोटींच्या शालार्थ घोटाळ्याचा पर्दाफाश, आरोपीच्या घरात महत्त्वाची कागदपत्रे; 12 शाळा अडचणीत

Shalarth ID Scam | राज्यभरातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या 160 कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. या घोटाळ्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तब्बल १२ शाळा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील एका अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या घरातून नाशिकमधील शाळांशी संबंधित बनावट शालार्थ आयडी तयार करण्यासंदर्भातील कागदपत्रे आढळल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे नाशिकमधील संबंधित शाळा, संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार तपासात उघड झाला आहे. आतापर्यंत राज्यभरात एक हजारांहून अधिक बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात शिक्षक, संस्थाचालक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, अनेक संशयित आरोपी गेल्या काही महिन्यांपासून कारागहात आहेत.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील एका संशयित आरोपीच्या घरात नाशिकमधील शाळांची कागदपत्रे आढळल्याने तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या कागदपत्रांचा बनावट शालार्थ आयडी तयार करण्याशी नेमका काय संबंध आहे, संबंधित शाळांची भूमिका काय होती आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोणाचा सहभाग होता, याचा तपास होण्याची शक्यता आहे.

त्यामळे संबंधित व्यवस्थापनासह शाळांच्या संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याचे संकेत मिळत आहेत. १२ शाळांशी संबंधित कागदपत्रे आढळल्याने नाशिकमधील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता तपास यंत्रणा या शाळांपर्यंत पोहोचते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचे चेहरे उघड होतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

नाशिक कनेक्शन समोर

राज्यभरात या घोटाळ्याची व्याप्ती उघड झाल्यानंतरही त्याचे नाशिक कनेक्शन समोर आल्याने शिक्षण विभागातील संशयास्पद व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळांच्या नावाने बनावट आयडी तयार करण्यामागे नेमके कोणते रॅकेट कार्यरत होते, त्यातून किती आर्थिक गैरव्यवहार झाला आणि आणखी किती शाळांचा यात सहभाग आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT