नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराच्या वाढत्या पाण्याच्या गरजेच्या तुलनेत यंदा मंजूर झालेल्या जलारक्षणात मोठी तूट निर्माण झाली आहे. मात्र, सिंहस्थासाठी ६३५ (एमएमसीफटी) आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महापालिकेने २०१६-१७ या वर्षासाठी ७ हजार ६६७ दशमलव घनफूट (एमएमसीफटी) पाण्याची मागणी केली होती.
मात्र, जलसंपदा विभागाने ६ हजार ३१७.९ एमएमसीफटी पाण्याचे आरक्षण मंजूर केल्यामुळे तब्बल १ हजार ३५० एमएमसीफटी म्हणजे सुमारे १८ टक्के पाणी कमी मिळणार आहे.
मागणीच्या तुलनेत सुमारे १४.६ टक्के तूट असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेला काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. २९) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण निश्चिती समितीची बैठक झाली. या बैठकीला महापौर हिमगौरी आहेर - आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत आदी उपस्थित होते.
नाशिकला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह, दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील आरक्षण कालावधीत या स्रोतांमधून महापालिकेला एकूण ६,७९५.८६ एमएमसीफटी पाणी उपलब्ध झाले होते. यंदा शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन, महापालिकेने गंगापूर, गौतमी गोदावरी आणि कश्यपी धरणसमूहून ४ हजार ८१२ एमएमसीफटी, दारणा धरणातून ९९१ एमएमसीफटी आणि मुकणे धरणातून १ हजार ८४४ एमएमसीफटी पाण्याची मागणी केली होती.
मात्र, राष्ट्रीय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निकषांनुसार जलसंपदा विभागाने एकूण ६ हजार ३१७ एमएमसीफटी पाणी मंजूर केले आहे. संभाव्य अल निनो प्रभावामुळे तापमानामध्ये वाढ होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले.
पाणी आरक्षणात मोठी तफावत असल्यामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवून, महापालिकेला वितरण व्यवस्था, दैनंदिन वापर आणि संभाव्य टंचाई यांचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर १० टक्के पाणीकपात करणे अनिवार्य असले, तरी यासंदर्भातील अंतिम निर्णय दिवाळीनंतर बैठक घेऊन करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
बैठकीत महापौर आहेर - आडके यांनी सध्यास्थितीत कमी प्रमाणात पाणीपुरवठा सुरू असून, अशा स्थितीत पाणीकपात योग्य नसल्याचे नमूद केले. तसेच दिवाळीपूर्वी पाणीकपात केल्यास नागरिकांमध्ये नाराजी वाहण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील धरणामधील जलसाठ्याचा आढावा सादर केला.
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, उपलब्ध जलसाठ्याचा अपव्यय रोखण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पाणीगळती आणि चोरीची रेकग्न्ससह धरणातून होणारा अनधिकृत पाणी उपसा थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत विद्युतपंपाचा वापर करून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जलसंपदा, महसूल आणि पोलिस विभागाने समन्वयकाने काम करावे, अशी स्पष्ट करण्यात आले.
आगामी नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूग्रामसह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन, ६३५ एमएमसीफटी पाण्याचे स्वतंत्र आकस्मिक आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये गंगापूर धरणातून ६५ एमएमसीफटी, तर दारणा धरणातून ५७० एमएमसीफटी पाणी उपलब्ध होणार आहे.