वावी (ता. सिन्नर, नाशिक) : येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
यावेळी प्रकल्पाच्या जनजागृतीसाठी मशाल फेरी, प्रभात फेरी व गाव नकाशा तयार करण्याचे आयोजन करण्यात आले. सरपंच विजय काटे आणि कृषी सहाय्यक नितीन खिंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरपंच काटे यांनी वावी गावाची पोकरा कृषी योजना राबविण्यासाठी निवड झाल्याची माहिती दिली. सध्या गावाचा कृषी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
या कार्यक्रमाला माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रामदास घेगडमल, विठ्ठलराव राजेभोसले, अर्जुन काटे, अशोक वेलजाळी, पोपट वेलजाळी, गणेश वेलजाळी, दिलीप वेलजाळी, विनायक घेगडमल, बाळासाहेब खाटेकर, शंकर रसाळ, नामदेव वेलजाळी, संतोष भोपी, दिलीप खाटेकर, अजित देसाई, दत्तात्रय पाटोळे, संतोष जोशी, सविता साळवे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर गावातील अहिल्यादेवी होळकर सभागृहात ‘पोकरा योजना’ विषयक सविस्तर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यामध्ये संतोष भोपी, विठ्ठलराव राजेभोसले, गणेश वेलजाळी, कृषी सहाय्यक नितीन खिंडकर आणि सरपंच विजय काटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठलराव राजेभोसले यांनी “या योजनेत एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जावी,” असे सुचवले. तर सरपंच विजय काटे यांनी “गावातील प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल,” असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी सहाय्यक नितीन खिंडकर यांनी उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.