पंचवटी : श्री कपालेश्वर महादेव मंदिरात संस्थान तसेच कपालेश्वर मंदिरातील गुरव यांच्या स्वतंत्र दानपेट्या आहेत. या मंदिरात बसविलेल्या दानपेटयांबाबत धर्मदायुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून गेल्या (दि. २६) सप्टेंबर रोजी या मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या. या सील केलेल्या दानपेट्या तब्बल सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवारी (दि. ३) रोजी धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने उघडण्यास सुरवात झाली आहे.
मंगळवारी (दि. ३) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमाराला धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तसेच कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत एक दानपेटी उघडण्यात आली तर उर्वरित संस्थान तसेच गुरव यांनी बसविलेल्या इतर दानपेटया उघडणे काम बाकी आहे. सलग दोन ते तीन दिवसात सर्व दानपेट्या उघडल्या जाणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे. गत सप्टेंबर महिन्यात धर्मदाय आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटया सील करण्यात आल्या होत्या.
मंगळवारी (दि. ३) सकाळी विश्वस्त मंडळाची एक दानपेटी पोलिस बंदोबस्तात उघडण्यात आली. दानपेटीतील रक्कम एका गोणीत भरून विश्वस्त मंडळ कार्यालयात नेण्यात आली. त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयातील हरिहर गाडगे, प्रसाद अत्तरे, एस. आर. हळदे, विश्वस्त ॲड. अक्षय कलंत्री, रावसाहेब कोशिरे, व्यवस्थापक सुनील शिनगान यांच्यासह मंदिर कर्मचारी दानपेटीत जमा झालेल्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे व पाचशे रुपये दरांच्या नोटा आणि इतर सुट्टी नाणी वेगवेगळे करत नोटा मोजण्याच्या यंत्राद्वारे एकूण रक्कम मोजली. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
संस्थानची पहिल्या दानपेटीत ४,३०,९४४ /- इतकी रक्कम मिळाली असून, अजून उर्वरित चार दानपेट्यांमधील दानाची मोजणी बाकी होती. दानपेटीत मिळालेली सर्व रक्कम संस्थानच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे