नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्याध्यापकांवर आता आणखी एक जबाबदारीचे ओझे टाकण्यात आले आहे. शाळा परिसर स्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करणे, कुत्रा आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून शाळा मुख्याध्यापकांची नेमणूक करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिले आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी जगताप यांनी पत्र काढले असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राचा मुख्याध्यापक तसेच शिक्षकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. देशभरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रत्येक शैक्षणिक संस्थेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी 'नोडल अधिकारी' नेमण्याचे परिपत्रक काढले होते. याच धर्तीवर आता शालेय शिक्षण विभागानेही अशाच आशयाचे परिपत्रक काढले आहे. याच पत्राच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक विभागाने देखील जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, शाळा, खासगी शाळा यांच्या मुख्याध्यापकांना पत्र काढले आहे.
भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमांच्या प्राथमिक/जि.प./मनपा शाळांचे मुख्याध्यापक यांना जिल्हास्तरावरून नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. नियुक्त नोडल अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी संदर्भीय पत्राचे अवलोकन करून सुमोटो याचिका निर्देशानुसार कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.