नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निफाड येथील स्टेट बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये ५०० रुपयांच्या तब्बल ४७ बनावट नोटा जमा करून, बँकेची फसवणूक करणाऱ्या संदीप निकम (४२, रा. माधव पार्क, दामोदरनगर, जेलरोड, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने निफाड येथे स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये ५०० रुपये दराच्या एकूण ४७ बनावट नोटा जमा केल्या होत्या. या नोटा बनावट असल्याचे माहिती असतानाही त्या सीडीएम मशीनमध्ये भरल्या.
याप्रकरणी बँकेचे उपव्यवस्थापक हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोटा भरणारा संशयित निकम हा शहरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना मिळाली.
गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या पथकाने नाशिक-पुणे रोड परिसरातून आंबेडकरवाडीजवळ संदीप निकमला ताब्यात घेतले. त्याला निफाड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.