नाशिक :महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा सातपूर विभागात उत्साह दिसून आला. मतदानासाठी सकाळच्या सुमारास मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी तुरळक, तर सायंकाळी मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. विभागातील चारही प्रभागांमध्ये किरकोळ घटना वगळता, विनावाद मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10 व 11 मधील 16 जागांसाठी रिंगणात असलेल्या 95 उमेदवारांनी मतदारांची मने वळविण्यासाठी मतदानाच्या दिवशीदेखील प्रयत्न केल्याचे दिसून आले. सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती.
सकाळच्या सुमारास मतदारांमध्ये उत्साहात दिसून आल्याने, सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंत प्रभाग क्र. 8 मध्ये 19.47 टक्के, प्रभाग क्र. 9 मध्ये 18.14 टक्के, प्रभाग क्र. 10 मध्ये 18.82, तर 11 मध्ये 14.34 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान प्रभाग क्र. 8 मध्ये 11.29, प्रभाग क्र. 9 मध्ये 11.54 टक्के, प्रभाग क्र. 10 मध्ये 11.74 टक्के, तर प्रभाग क्र. 11 मध्ये 10.94 टक्के मतदान झाले. दुपारी 1.30 ते 3.30 दरम्यान प्रभाग क्र. 8 मध्ये 11.48 टक्के, प्रभाग. क्र. 9 मध्ये 13.17 टक्के, प्रभाग क्र. 10 मध्ये 14.65 टक्के, तर प्रभाग क्र. 11 मध्ये 14.9 टक्के इतके मतदान झाले. ईव्हीएम मशीनवर अ, ब, क, ड या उमेदवार गटांची मांडणी उलटसुलट असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
दुपारनंतर मात्र मतदानाचा उत्साह वाढल्याने, मतदानाचा आकडा वाढत गेला. दरम्यान, सातपूरमधील चारही प्रभागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. विनावाद मतदान प्रक्रिया पार पडल्याने, मतदारदेखील बिनधास्तपणे मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिस यंत्रणेने मतदान सुरळीत पार पडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
लोंढेंची चर्चा अन् समर्थकांमध्ये उत्साह
गोळीबारप्रकरणी कारागृहात असलेले प्रभाग 11 मधील रिपाइंचे उमेदवार प्रकाश लोंढे यांना मतदानासाठी प्रभागातील स्वारबाबानगर येथील मनपा शाळा क्रमांक 19 या मतदान केंद्रात आणले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. दुपारी 3.30 च्या दरम्यान त्यांना आणले जाणार असल्याची चर्चा रंगल्याने, त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह होता. मात्र, न्यायालयाने त्यांना याबाबतची परवानगी नाकारल्याचे स्पष्ट झाल्यामुळे समर्थकांमध्ये निराशेचा सूर दिसून आला.
पोलिसांचा विशेष बंदोबस्त
सातपूर विभागात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त दिला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी विभागातील चारही प्रभागांत भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. प्रभाग 9 मधील संवेदनशील शिवाजीनगर येथील मनपा शाळेतील मतदान केंद्र परिसरात पाहणी केली आणि परिसरातील गर्दी दूर करण्याच्या सूचना केल्या.
ज्येष्ठांसह तरुणांचाही उत्साह
मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांसह तरुणदेखील मोठ्या संख्येने पोहोचल्याचे दिसून आले. अनेकांनी मतदान केल्यानंतर सेल्फी घेत, सोशल मीडियावर शेअर केले. मतदान केंद्राबाहेर सेल्फी पॉइंट उभारले गेले नसल्याने, बऱ्याच मतदारांचा हिरमोड झाला.
ईव्हीएम बिघाडाची परंपरा कायम
ईव्हीएम बिघाडाची परंपरा यावेळीदेखील कायम असल्याचे दिसून आले. प्रभाग 10 मधील मीनाताई ठाकरे मनपा शाळेतील मतदान केंद्र 24 येथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान करताना मशीनवरील बटणच दाबले जात नसल्याच्या तक्रारी मतदारांकडून केल्या गेल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ‘दुसरे बटण दाबा’ असा अजब सल्ला दिल्याने, मतदारांनी संताप व्यक्त केला, तर उमेदवारांनीही अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असलेल्या या अजब सल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी अधिकारी, मतदार, उमेदवार यांच्यात किरकोळ शाब्दिक वादही झाला.
प्रभाग 10 च्या उमेदवाराचा 11 मध्ये बूथ
प्रभाग 10 मधील हौशी उमेदवाराने आपला बूथ चक्क प्रभाग 11 मध्ये लावला होता. जेव्हा मतदार या बूथवर गेले, तेव्हा हा बूथ 10 मधील असल्याची बाब लक्षात आली. उमेदवाराकडून झालेल्या या चुकीची चर्चा सातपूर विभागात दिवसभर सुरू होती.
अनुक्रमांकावरून आक्षेप
बहुतांश मतदान केंद्राबाहेर ईव्हीएमवरील उमेदवारांची यादी ‘अ-ब-क-ड’ अशा क्रमाने न लावता ‘ड-क-ब-अ’ अशा क्रमाने लावल्याने, काही उमेदवारांनी यावर आक्षेप नोंदविला. रिपाइंच्या उमेदवार दीक्षा लोंढे यांनी यावर हरकत घेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला जाब विचारला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची हरकत फेटाळली.
दिवसभर उमेदवार मतदान केंद्राबाहेर
सकाळपासूनच उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करीत, येणाऱ्या मतदारांना ‘मलाच मतदान करा’ यासाठी गळ घातल्याचे दिसून आले. काहींना हात जोडून, तर काहींच्या पाया पडून उमेदवार मतदारांना गळ घालताना दिसून आले. काही उमेदवार तर सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते.