सातपूर ( नाशिक ) : महादेववाडी परिसरात बुधवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास घडलेल्या भीषण जळीत दुर्घटनेतील सहापैकी चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, दीडवर्षीय बालकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने महादेववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
महादेववाडी येथील खोका मार्केटसमोर पिंपळाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला पेट्रोलने भरलेली प्लास्टिक कॅन ठेवली होती. या कॅनवरून चारचाकी वाहन गेल्याने कॅनमधील पेट्रोल सांडून भडका उडाला. क्षणात पेट्रोलने पेट घेतल्याने आगीचा फडका होऊन या घटनेत दोबाडे कुटुंबातील लता कैलास दोबाडे, कैलास दोबाडे, दुर्गा आकाश दोबाडे, भावेश आकाश दोबाडे तसेच सोनाली राजेश गाडेकर आणि पंकज दोबाडे असे एकूण सहा जण गंभीर भाजले होते.
या चौघांचा मृत्यू
सर्वांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच पंकज कैलास दोबाडे (३०), दुर्गा दोबाडे (२२), कैलास छगन दोबाडे (६०) व सोनाली राजेश गाडेकर (रा. महादेवनगर, सातपूर) या चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे दाभाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोषींवर कडक कारवाईची मागणी
स्थानिक नागरिकांनी ठेकेदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.