नाशिक : संस्कृत भाषा असून, सर्वांनी तिचा अंगीकार केला पाहिजे. नाशिकच्या संस्कृत विद्यापीठातून शिकून जाणारे विद्यार्थी जीवनात मोठी क्रांती करतील, असे प्रतिपादन कैलास मठाचे प्रमुख महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती यांनी केले.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित उत्कर्ष महोत्सव २०२५ मध्ये आयोजित संत संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद सरस्वती होते. व्यासपीठावर पंचमुखी हनुमान मंदिराचे प्रमुख भक्तिचरणदास महाराज, एबीपीएस स्वामी नारायण मंदिर नाशिकचे प्रमुख श्री श्री दिव्यनयनदास महाराज, वारकरी संप्रदायाचे रामकृष्ण महाराज लहवितकर, देवबाप्पा फरशीवाले, कीर्तनकार दिनेश महाराज रसाळ, तुळशीराम गुट्टे महाराज, कुलगुरू हरेराम त्रिपाठी, कुलगुरू सुकांतकुमार सेनापती, प्रल्हाद जोशी उपस्थित होते. सविदानंद सरस्वती म्हणाले, जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत संस्कृत आहे. आजकाल संस्कृत नसल्याने संस्कार उरले नाहीत. नाशिकमध्ये रामाचे आशिक लोक राहतात. त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचा वास आहे. शिवाची उपासना केली तर जीवन मंगलमय होईल.
भक्तिचरणदास महाराज म्हणाले, संस्कृती टिकवायची तर मुलांना संस्कृत शिकवा. दिनेश महाराज रसाळ यांनी, संत साहित्याचे मूळ संस्कृतमध्ये आहे. दिव्यानंद महाराज यांनी, संस्कृत ही एक मातृभाषाच आहे. तिच्याशी जोडले गेलो तर पुढे जाऊ. जर्मनीत संस्कृत भाषा शिकवली जात आहे. आपण शास्त्र वाचत नाही. शास्त्रावर विश्वास ठेवत नाही. संस्कृत भाषा सर्व भाषांची मातृभाषा आहे. तर रामकृष्ण लहवितकर म्हणाले, संस्कृत सामन्याची भाषा झाली पाहिजे, असा संकल्प करा. वारकरी पंथालाही संस्कृतचे आकर्षण आहे. वारकरी संप्रदाय हा वैदिकच आहे. यावेळी कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव मुरली कृष्णा, प्रो. निलाभ तिवारी यांच्या हस्ते संतांचा सत्कार करण्यात आला.