Welcome to the New Year, with a resolution for hotel cleanliness.
नाशिक : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची 'स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा' हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सोमवारपासून विभागात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १७ फूड इन्स्पेक्टरवर जबाबदारी देण्यात आली आहे. ते आपल्या झोनमध्ये किमान २० हॉटेल्समध्ये हा उपक्रम राबविणार आहेत.
नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यांतील अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात झाली. यात त्यांच्या संकल्पनेतून 'स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा' हा विशेष उपक्रम दि. २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. नववर्षाचे आगमन आणि ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपाहारगृहे व आस्थापनांत तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
दरम्यान, २६ डिसेंबरपासून जरी हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला असला, तरी औषध व अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या निवडणुकीचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच गुरुवारी नाताळची सुटी होती. शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी आली. त्यामुळे या उपक्रमाच्या अंमलबजावणी नाशिक विभागात सोमवार (दि. २९) पासून केली जाणार आहे. या उपक्रमात नाशिक विभागात १७ फूड इन्स्पेक्टर प्रत्येकी २० हॉटेल्सची जबाबदारी घेत सहभागी होणार आहेत. या मोहिमेत साधारण ३५० हॉटेल्समध्ये स्वच्छता राबविली जाणार आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही हॉटेल्समध्ये अस्वच्छता निर्माण होणार नाही. त्याचा परिणाम तेथील अन्न पदार्थांवर होऊ नये, म्हणून दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती संबधितांनी दिली.