नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहनचालकांत वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम (रडार यंत्रणा) या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्वयंचलितरीत्या कारवाई करण्यात येणार आहे.
प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत ३९ हजार २३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे ७ कोटी ८४ लाख रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
यात विनाहेल्मेट वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, एचएसआरपी नंबरप्लेट नसणे, विना सीटबेल्ट वाहन चालवणे तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांचा समावेश आहे. यासह वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे, महामार्ग तसेच नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर रडार यंत्रणेसह सज्ज असलेल्या तीन रडार इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे वाहनचालकांचा वेग, हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट, वाहनांची नंबरप्लेट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधून तत्काळ ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात येत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाईही करण्यात येत आहे. ही कारवाई केवळ दंड वसूल करण्यापुरती मर्यादित नसून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
आरटीओकडून २० पर्यंत वाहनांची तपासणी मोहीम
प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करणे तसेच खासगी प्रवासी बस वाहतुकीतील नियमभंगाला आळा घालण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत २० नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व खासगी बस वाहतूकदारांनी आपल्या वाहनांची वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहन सुयोग्य स्थितीत असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करावी. तसेच प्रवाशांकडून नियमानुसारच भाडे आकारावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३१७ खासगी प्रवासी बसेसची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १२७ बसेस दोषी आढळल्या आहेत. संबंधित वाहनांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतून आतापर्यंत ३ लाख ९९ हजार रुपये तडजोड शुल्क (दंड) व करापोटी वसूल करण्यात आले आहेत.
खासगी प्रवासी बस वाहतुकीतील नियमांचे पालन, वाहनांची तांत्रिक सुस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वाहतूकदारांनी नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केल्यास विशेष तपासणीदरम्यान संबंधित वाहन दोषी आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक व अन्य आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी कळविले आहे.