नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात दरड कोसळण्याच्या वारंवार घडणार्या घटनांमुळे नागरिक आणि वाहतुकीस धोका निर्माण होतो. या पार्श्वभुमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने घाट रस्त्यांच्या सुरक्षितेसाठी शासनाने 17 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे घाट रस्त्यांच्या कामांना गती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. घाट रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना आयआयटी पवईतर्फे देण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड, पिंपळगाव बसवंत, सुरगाणा तालुक्यातील घाट रस्ते हे परिसर पावसात अत्यंत धोकादायक ठरतात. याठिकाणी वारंवार दरड कोसळणे, वाहतूक विस्कळीत
होणे किंवा अपघात होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शासनाकडे उपाययोजनांसाठी निधीची मागणी केली होती. सप्तशृंगी गड घाटातील ठराविक संवेदनशील भागांमध्ये दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन आयआयटी पवईच्या तज्ज्ञ टीममार्फत जिओलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांच्या शिफारसीनुसार, संबंधित भागात लोखंडी संरक्षक जाळ्यांच्या सहाय्याने दरड दुर्घटना रोखण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेमुळे घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
सुरगाणा परिसरातील घाट रस्त्यांसाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या रस्त्यांवरील धोकादायक वळणे आणि दरडी रोखण्यासाठी उपाययोजना राबवली जाणार आहे.
पिंपळगाव बसवंत येथील 'बटाटा उतार' हा उतार अत्यंत तीव्र असून तेथे वारंवार अपघात होतात. या उताराला सुलभ आणि सुरक्षित बनवण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होणार असून प्रशासकीय मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विकास कामांना गती येणार आहे.
आगामी पावसाळ्यापूर्वी या कामांची शक्य तितकी अंमलबजावणी होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपाययोजनांमुळे नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरातील प्रवास अधिक सुरक्षित होण्याची शक्यता असून, भविष्यातील आपत्तीजनक घटनांना आळा बसेल. तसेच, सप्तशृंगी गड व इतर धार्मिक-पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग सुरक्षित होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.