नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर हवाल्याची रक्कम वाहून नेणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवून, रंगीत तालीम करत अचूक नियोजनाने एखाद्या सिनेमाप्रमाणे दरोडे टाकणाऱ्या केरळस्थित आंतरराज्य टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. यात १२ जणांना अटक करून सुमारे १९ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच संशयित फरार आहेत.
११ डिसेंबर २०२५ रोजी वाडीवऱ्हे पोलिस ठाणे हद्दीत राजूर पाटी परिसरात गुजरात येथील धर्मेंद्र पटेल हे स्कॉर्पिओ वाहनातून ग्वाल्हेरहून मुंबईकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या वाहनास अडवून फिर्यादी व साथीदारांना मारहाण, तसेच त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकण्यात आली. त्यानंतर ४ लाख ५० हजार रुपयांची रोकड जबरीने लुटली. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे हलविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, सिन्नर ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, वाडीवऱ्हेचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट देत फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाच्या मदतीने पुरावे संकलित केले. सुमारे १००० सीसीटीव्ही फुटेज आणि हजारो कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. आरोपींची बोलीभाषा व देहबोली लक्षात घेता ते केरळ राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातून बाबू व्ही. आर. रमन पिल्ले (५४) व आकाश एस. कांत (१८) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून उर्वरित साथीदारांची माहिती मिळाली. दरम्यान, टोळी पुन्हा नाशिक जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच सिन्नर तालुक्यात संयुक्त छापा टाकण्यात आला. या कारवाईत नियास मुहम्मद अली (२६), मुहम्मद आदिल अब्दुल माजिद (२५), अनिलकुमार करुणाकरा कुरूप (४७), सबरीनाथ विनु के. व्ही. (२४), आसिफ हमीद (४०), अब्दुल हमीद नासर (३४), शाहरुख पी. एस. शहाजहान (२६), सिरल बाबू मजिद (४०), अरूणकुमार के. (४४) व सबीश व्ही. एस. संतोष (४०) यांना अटक करण्यात आली. पाच साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे, रूपाली चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, शैलेश पाटील, अंमलदार प्रवीण काकड, विनोद टिळे, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, संतोष दोंदे, सतीश घुटे, नवनाथ शिरोळे, श्रीकांत गारुंगे, कैलास भानकर, प्रदीप बहिरम, बालाजी कुंटेवाड, केतन कापसे, नितीन गांगुर्डे, शिरीष गांगर्डे, समाधान बोराडे, नितीन डाबखर, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे यांनी केली.
देशातील विविध भागांतून हवाल्याची करोडोची रक्कम विशिष्ट प्रकारे पाठविली जाते. हवालाद्वारे पैसे पाठविणाऱ्या एका स्वतंत्र गटाच्या माध्यमातूनच हे पैसे देशभर पाठविले जातात. या मधीलच एक व्यक्ती सदर माहिती कोणत्या वाहनातून पैसे जाणार आहेत, याबद्दलची माहिती या टोळीला पुरवित होता. त्यानंतर सदर वाहन कसे जाणार आहे. कसे व कोठून जाणार याविषयीची रंगीत तालीम ही टोळीच पूर्वी सुरुवातीला करत असे त्यानंतर त्या वाहनाला जीपीएसद्वारे ट्रॅक करून विशिष्ट ठिकाणी अडवून त्यांची लूट केली जायची.
संशयितांकडून लोखंडी तलवारी, गुप्ती, कोयते, टोकदार चाकू, दोन हातोडे, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड तसेच टोयोटा इटियॉस (केएल ३२, डी ४२२६), मारुती स्विफ्ट (केएल १४, के ६३४३) आणि होंडा सिटी (केएल ४४, एफ ४००) तीन चारचाकी वाहने, मोबाइल फोन, विविध बँकांचे एटीएम व क्रेडिट कार्ड असा एकूण १९,५५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.