नाशिकरोड : एकलहरे रोड येथील नाशिकरोड उपबाजार समिती परिसरातील चिखलमय झालेला रस्ता. Pudhari News Network
नाशिक

Nashik Road Sub Market Committee | नाशिकरोड उपबाजार समितीकडे शेतकऱ्यांची पाठ

आवारातील रस्त्यांवर खड्डे, चिखलाचे साम्राज्य, रात्री विजेअभावी अंधार

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने व ताजा भाजीपाला लवकरात लवकर ग्राहकांच्या हाती पडण्यासाठी जिल्हा बाजार समितीने एकलहरे रोड येथे उभारलेल्या नाशिकरोड उपबाजार समितीकडे शेतकऱ्यांना सुविधा मिळत नसल्याने पाठ फिरवली आहे. त्यामुळे भव्य दिव्य स्वरूपातील उपबाजार समितीचे आवार मोकळे पडले आहे.

सिन्नर तालुक्यापर्यंत तसेच इगतपुरी तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांसाठी भाजीपाला, शेती उत्पादक वस्तू ग्राहकांना तत्काळ मिळण्यासाठी जिल्हा बाजार समितीने एकलहरे रोड या ठिकाणी उपबाजार समिती उभारली. सुरुवातीला अनेक पेढ्यांमधून शेतकरी आपला माल देत होते. मात्र शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. शेतकरी आपला शेतमाल घेऊन सायंकाळच्या सुमारास समिती आवारात येत होते. मात्र या ठिकाणी वीजपुरवठ्याची समस्या असल्याने मोठ्या प्रमाणात अंधार होत होता. नाशिकरोड उपबाजार समिती स्थापनेपासून कोणत्याही प्रकारची डागडुजी न केल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाले असून चिखलाचे साम्राज्य आहे.

उपबाजार समितीने या ठिकाणी अनेक गाळे व्यापाऱ्यांसाठी बांधले. परंतु शेतकरीच येत नसल्यामुळे व्यापारीदेखील या ठिकाणी येण्यास तयार नाहीत. स्वागत कमान पूर्णपणे गंजली असून, ती पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी

येथे दर शनिवारी येथे आठवडे बाजार भरतो. बाजार समिती पटांगणात हा बाजार भरवण्याची व्यवस्था असताना काही भाजी विक्रेते बाजार समितीबाहेर, कमानीखाली आणि रस्त्यावर बसून विक्री करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस आणि बाजार समिती अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nashik Latest News

नाशिकरोड : एकलहरे रोडवरील येथील नाशिकरोड उपबाजार समितीची गंजलेली कमान.
बाजार समितीमध्ये बोटावर मोजण्याइतके व्यापारी आहेत. ते पटाव पद्धतीने माल घेतात. लिलाव होत नाहीत. त्यामुळे मालाची, बाजारभावाची पातळी कळत नाही. मनमानी पद्धतीने भाव ठरवतात.
श्याम मस्के, प्रगतशील शेतकरी, सामनगाव रोड
सध्या कंपाउंडचे काम सुरू आहे. जुनी कमान काढून नवीन कमान उभारण्यात येणार आहे. गेट व प्रसाधनगृहाचे कामदेखील लवकरात लवकर होण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. सध्या उभारलेले गाळे तोडून भव्य मार्केट उभारण्यात येणार आहे.
सविता तुंगार, विद्यमान संचालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT