नाशिक रोड : महापालिकेच्या वतीने चंदनवाडी भागात सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयांची दुरवस्था झाली आहे. या परिसरात एकूण २२ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असले, तरी देखरेख व स्वच्छतेअभावी त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दुर्गंधी, अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रभाग क्रमांक २१ मधील सत्कार पॉइंटजवळील शौचालयाची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, स्वच्छता कर्मचारी महिन्यातून एक किंवा दोनदा येतात. परिसरात सुमारे २०० ते २५० घरे असून, सर्व नागरिक याच शौचालयाचा वापर करतात. मात्र, येथील स्वच्छतेकडे मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या उपलब्ध २२ शौचालयांपैकी १५ शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक चेंबर फुटले असून, परिसरात सांडपाणी पसरत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून दररोज शौचालयाची साफसफाई करून द्यावी तसेच तुटलेले भांडे तसेच स्टाइल्सची दुरुस्ती करावी अशी मागणी चंदनवाडी येथील नागरिकांनी केली आहे.
माझे घर या शौचालयाच्या जवळ आहे. येथे अनेक दारूडे येऊन घाण करतात तसेच दारूच्या बाटल्या आत फेकतात. त्यामुळे बरीचशी शौचालये तुंबलेली आहेत. पाण्याची टाकीही गळतीमुळे खराब झाली आहे.रोहिणी गोसावी, स्थानिक रहिवासी, नाशिक.
शौचालय बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहे. १० ते १५ दिवसांपासून सफाई कर्मचारी आलेले नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आमची लहान मुले आजारी पडली आहेत. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती व स्वच्छता करावी.सुनीता जाधव, स्थानिक रहिवासी, नाशिक
सध्या प्रशासकीय राजवट असल्याने कर्मचारी आवश्यक त्या प्रमाणात लक्ष घालत नाहीत. त्यामुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अन्यथा नागरिकांना घेऊन महापालिकेत आंदोलन करावे लागेल.श्याम खोले, माजी नगरसेवक, नाशिक.