नाशिकरोड : विभागात आठ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीत दुपारपर्यंत मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह जाणवला नाही. गलिच्छ राजकारण, फोडाफोडीचे राजकारण आणि पैशांच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत उदासीनता दिसल्याचे चित्र अनेक भागांत दिसले.
सकाळपासूनच नाशिकरोड परिसरातील मतदान प्रक्रियेला वादांचे गालबोट लागले. विविध प्रभागांमध्ये पैशांचा महापूर, कार्यकर्त्यांतील वाद, तसेच हल्ल्याच्या घटना समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभाग 21 मध्ये तोतया अधिकारी पैसे वाटताना सापडल्याची घटना उघडकीस आली. त्याला संतप्त नागरिकांनी चोप दिल्याची चर्चा असून या घटनेने खळबळ उडाली होती. प्रभाग 17 मध्ये उमेदवाराच्या नातेवाइकांकडून खुलेआम पैशांचे वाटप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. प्रभाग 18 मध्ये आजारी उमेदवाराने व्हीलचेअरवर येत मतदारांना मतदानाचे आवाहन केल्याने भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
प्रभाग 19 मध्ये जातीपातीचे राजकारण तसेच सर्वच उमेदवारांकडून पैशाचा ऊहापोह याबरोबर काही अपवाद वगळता, मतदारांचा उत्साह समाधानकारक होता. प्रभाग 20 मध्ये कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले असून, या प्रभागात सर्वाधिक पैशांचा ओघ असल्याच्या चर्चा रंगल्या. प्रभाग 21 मध्ये मतदानाचा उत्साह कमी-जास्त प्रमाणात दिसून आला. भाजप उमेदवार टिंकू खोले यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्रभाग 22 अंतर्गत देवळाली गाव, वडनेर पिंपळगाव खांब, सौभाग्यनगर, वडनेर गेट आदी परिसरात मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. पण मतदानाच्या शेवटी मतदान केंद्र क्रमांक 13 येथे ताहीर पठाण या युवकाचे बोगस मतदान झाल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून अर्ज लिहून घेत त्याला मतदान करण्याची संधी दिली. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रभागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सोशल मीडियावर व्हिडिओंचा पूर
मतदानादरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उपनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रभाग 21 मध्ये उमेदवाराच्या घरावर हल्ला
नाशिकरोड प्रभाग 21 मध्ये अनोळखी व्यक्ती पैसे वाटताना सापडल्यामुळे संतप्त नागरिकांनी भाजप उमेदवाराच्या घरावर दगडफेक करून नुकसान केल्याची घटना घडली. माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दगडफेक करणारे फरार झाले असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल
देवळाली गावात पैसे वाटताना सापडलेल्या व्यक्तीचे नाव सिद्धांत विलास पाटील असल्याचे ओळखपत्रावर दिसून आले आहे. तो एका अधिकाऱ्याचा स्वीय सहायक असल्याचेही त्यावर नमूद आहे. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्याला घेरून चौकशी केली असता, तो धुळ्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन उपनगर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
पैसे सापडल्यानंतर कार जप्त
प्रभाग 17 मध्ये भाजप उमेदवार दिनकर आढाव यांच्या मुलीकडून खुलेआम पैसे वाटप केले जात असताना भरारी पथकाने संबंधित गाडीची तपासणी केली. कारमध्ये सुमारे दोन लाख रुपयांची रोकड पथकाला सापडली. यावेळी उपनगर पोलिसांनी फॉच्युनर कार जप्त केली.
प्रभाग 18 मध्ये भावनिक प्रसंग
प्रचारादरम्यान अचानक आजारी पडलेल्या उमेदवाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी ते थेट व्हीलचेअरवर मतदान केंद्रात आले आणि मतदारांना हात जोडून मतदानाचे आवाहन केल्याने परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.