नाशिक : रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी करण गायकर, राजू देसले, नानासाहेब बच्छाव, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, आशिष हिरे, दीपक हगवणे, सुदाम जाचक आदी. 
नाशिक

Nashik Ring Road Project|नाशिक परिक्रमा मार्गमुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल, १० दिवसांत उच्चस्तरीय बैठक

रिंगरोड : पुढील बैठकीत अंतिम निर्णयाचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Nashik Ring Road Farmers Meeting

नाशिक :

नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत येत्या दहा दिवसांत उच्चस्तरीय संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईत मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रिंगरोडबाधित गावांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या मागण्या सविस्तर मांडल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना पुढील बैठकीत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्याची माहिती छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिली. शेतकरी प्रतिनिधींनी सध्याच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे मखमालाबाद, मातोरी, चांदशी, मुंगसरा, जलालपूर, महादेवपूर, गोवर्धन, विंचूरगवळी, वडनेर दुमाला आणि पिंपळगाव बहुला आदी गावांतील सुमारे ४७ घरे बाधित होणार असून, अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच भूसंपादनातील कमी मोबदला, चुकीचे मूल्यांकन तसेच पर्यायी अलाइनमेंटचा प्रस्तावही नकाशे व तांत्रिक माहितींसह सादर करण्यात आला.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, योग्य मोबदला मिळेल आणि शक्य तितकी कमी घरे व शेती बाधित होतील, यासाठी शासन आवश्यक ती काळजी घेईल, असे आश्वासन दिल्याचे गायकर यांनी सांगितले. या प्रकरणाचा अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची १० दिवसांत संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये अलाइनमेंट आणि भूसंपादन मूल्यांकनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे गायकर यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीनंतर शेतकरी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत शासनाने त्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले असून, पुढील बैठकीत न्याय्य मोबदला आणि योग्य अलाइनमेंटबाबत ठोस निर्णय होईल, असा विश्वास छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष गायकर यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी राजू देसले, नानासाहेब बच्छाव, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, आशिष हिरे, दीपक हगवणे, सुदाम जाचक, सुदर्शन पाटील, अक्षय कातड, गोकुळ बोराडे, सागर लोणे, मनीष हांडोरे, पंकज खताळे, रवि पेखळे, रोशन उगले, सतीश संधान, मधुकर पोरजे, शिवाजी डांगले तसेच रिंगरोडबाधित गावांतील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT