Nashik Ring Road 
नाशिक

Nashik Ring Road | नाशिक रिंगरोडचे अलाईनमेंट कोणासाठी बदलले?

चौकशी आदेशानंतर मूळ आराखड्यापासून नव्या मार्गापर्यंतचा वाद चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ रिंगरोडच्या अलाइनमेंट बदलाची उच्चस्तरीय चौकशीची भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर या प्रकल्पाच्या अलाइनमेंटचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. रिंगरोडच्या मूळ नियोजनात बदल करून काही प्रभावशाली व्यक्ती, बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या हितासाठी हा रस्ता वळविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मूळ अलाइनमेंट कसे होते आणि NASHIK कोणते बदल झाले याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

बाधित शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या आराखड्यात काही भागांत रस्ता गवळवाडी परिसरातून नेण्याचा पर्याय होता. त्यामुळे मखमलाबाद, मातोरी, मुंगसरा, जलालपूर, महादेवपूर, चांदशी आणि गोवर्धन या गावांतील अनेक शेती, घरे आणि इतर बांधकामांवरील परिणाम तुलनेने कमी झाला असता, असा त्यांचा दावा आहे. मात्र, अंतिम अलाइनमेंटमध्ये बदल करून रस्ता या गावांतील शेती व वस्तीच्या जवळून नेण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची घरे, विहिरी, शेडनेट, पॉलिहाउस, व्यावसायिक दुकाने आणि इतर बांधकामे बाधित होत असल्याचे शेतकरी सांगतात.

तसेच विंचूरगवळी परिसरात विकास आराखडा (डीपी प्लॅन) विचारात न घेता अलाइनमेंट निश्चित करण्यात आल्याचा आरोप आहे. वडनेर दुमाला, विहितगाव परिसरात मोठे हायटेन्शन टॉवर असतानाही त्यांची दखल न घेता नियोजन करण्यात आल्याने शेतकऱ्यांनाही फटका बसत असल्याचे प्रतिनिधींचे म्हणणे आहे. याशिवाय सारूळ, पाथर्डी, पिंपळगाव बहुला, माडसांगवी आणि बेलगाव ढगा या गावांतील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित होत असल्याची तक्रार केली आहे.

काही अधिकारी आणि बिल्डर यांच्या फायद्यासाठीच हे बदल झाल्याचा गंभीर आरोप असला तरी यंत्रणांनी हे आरोप अद्याप फेटाळलेले नाहीत. त्यामुळे रिंगरोड अलाइनमेंट बदलाचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणाच्या चौकशीची तयारी सरकारने दाखविली आहे. या चौकशीनंतरच रिंगरोड अलाइनमेंट बदलाची वस्तुस्थिती जनतेसमोर येणार आहे.

रिंगरोडचे अलाइनमेंट मोजक्या अधिकारी, बिल्डर आणि हितसंबंधी घटकांच्या फायद्यासाठी बदलले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मखमलाबाद ते गोवर्धन या भागातील अलाइनमेंट बदलून गवळवाडीमार्गे रिंगरोड करण्यात यावा.

- करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT