नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होऊन ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्र कायम ठेवत, रिंग रोडबाधित शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीदेखील ठिय्या आंदोलन कायम ठेवले. पाऊस, ऊन आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शेतकरी व महिला आंदोलनस्थळी ठामपणे बसायला आहेत.
नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) आणि हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. किसान सभा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. किसान सभेचे राजू देसले, मनसेचे नेते सुदाम कोंबडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील कोथमीरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी यापूर्वीचे उपोषण मागे घेतले होते. मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली असली तरी त्यानंतरची अपेक्षित सविस्तर बैठक अद्याप झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
'पालकमंत्र्यांना रक्षाबंधनासाठी वेळ आहे; मात्र न्यायासाठी इंदिरानगर पोलिस ठाण्याबाहेर बसलेल्या शेतकरी महिलांना भेटण्यासाठी वेळ नाही,' अशी खंत आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली.
आंदोलनात शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, शिवाजी मोरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, योगेश गांगुर्डे, भारत पिंगळे, गोरख जाधव, आकाश जाधव, शुभम देशमुख, सोमनाथ बोराडे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
'लाडकी बहीण' योजनेवरून सवाल
रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधून आपल्या घरसंसार आणि शेतीचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकरी महिला मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. मात्र त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे 'लाडकी बहीण ही केवळ राजकारण आणि मतांसाठी आहे का? न्याय मागणाऱ्या त्याच लाडक्या बहिणींचा आर्त आवाज शासन कधी ऐकणार?' असा सवाल महिलांनी उपस्थित केला.
तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूने संताप
रिंग रोडच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून पिंपळगाव खांब येथील संपत नथू बोराडे, प्रेमा गोपाळ बोराडे आणि रेखा रामदास मुंडे या तीन शेतकऱ्यांचे अनुक्रमे २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी निधन झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनस्थळी या तिन्ही शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनांमुळे आंदोलकांमध्ये तीव्र दुःख आणि संतापाचे वातावरण असून, 'शासनाला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजेत?' असा सवाल आंदोलकांनी केला.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कार्यक्षम नेते असून, ते सकारात्मक दृष्टिकोनातून रिंग रोडचा प्रश्न सोडवतील, असा शेतकऱ्यांना आजही विश्वास आहे. मात्र निर्णयास होणारा विलंब आता शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे. आम्हाला आणखी शेतकरी गमवायचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी."- करण गायककर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना