एमएसआयडीसीच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन
३० ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास सामूहिक आत्महत्या
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद ते गोवर्धन आणि विंचूर गवळी परिसरातील पर्यायी अलाईनमेंटचे सर्वेक्षण करून, शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्याची मागणी असताना, शासनाने तसे आश्वासनही दिलेले असताना चांदशी येथील दोन गटांची खरेदी झाल्याने रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी (दि. २६) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक देत जोरदार आंदोलन केले.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील एमएसआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक देत जोरदार आंदोलन करीत भूसंपादन प्रक्रिया स्थगित असताना खरेदी झालीच कशी, असा सवाल करीत जोरदार आंदोलन केले.
त्यावर चांदशी येथील दोन्ही गटांची खरेदी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या लेखी आदेशानुसार झाल्याचा दावा एमएसआयडीसीचे अधिकारी संदीप पडांगळे यांनी केल्याचे आंदोलनाचे नेते करण गायकर यांनी सांगितले.
दरम्यान, पडांगळे यांनी खरेदी रद्द करण्यासाठी शासनाला अहवाल पाठवण्याचे आणि अंतिम निर्णय होईपर्यंत पुढील कार्यवाही न करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, ३० ऑक्टोबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास ३१ ऑक्टोबरला सामूहिक आत्महत्या करण्याचा इशाराही गायकर यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, आशीष हिरे, भारत पिंगळे, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, शुभम महाले, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, अलीम सय्यद आणि शाहरुख मन्सुरी यांच्यासह १५ गावांतील रिंगरोडबाधित शेतकरी सहभागी झाले होते.