Basmati Rice Price Hike Pudhari
नाशिक

Rice Price Hike | परतीच्या पावसाने भातशेतीला फटका; यंदा तांदळाचे भाव गगनाला भिडणार?

Rice Price Hike | गतकाळात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यंदा भात उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : अशोक निकम

गतकाळात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यंदा भात उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम तांदळाच्या दरांवर होणार असून, आगामी काळात तांदळाचे भाव गगनाला भिडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भातशेतीचे गणित बिघडल्याने उत्पादननंतरच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम झाला असून, तांदळाची वाढती मागणी पाहता भविष्यात मोठी दरवाढ अटळ मानली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते, ज्यामुळे येथील उत्पादन नेहमीच लक्षणीय असते. एकेकाळी भात तांदळात रूपांतरित करण्यासाठी घोटी व इगतपुरीची राइस मिल उद्योगात मक्तेदारी होती.

मात्र, आता हे चित्र बदलले आहे. पूर्वी दिंडोरी तालुक्यातील भात उत्पादकांना पदरमोड करून व वाहतूक भाड्याचा खर्च करून घोटी-इगतपुरीला जावे लागत असे. आता मात्र दिंडोरीतील वणी येथे तीन राइस मिल सुरू झाल्या असून, येथे मोफत तांदूळ काढून दिला जात आहे. तसेच कोणताही हमाली किंवा मजुरी आकारली जात नसल्याने उत्पादकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

नगदी पीक म्हणून कल

भात हे आता एक नगदी पीक मानले जाऊ लागले आहे. तांदूळ साठवून ठेवल्यानंतर खराब होत नाही आणि तांदूळ जितका जुना तितकी त्याची चव चांगली व दरही अधिक मिळतो. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी भातशेतीकडे वळले असून, दरवर्षी लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.

इंद्रायणी, कोळपी, दप्तरी, आर-२४, सोनम, ब्राऊन राइस, ब्लॅक राइस (काळा तांदूळ) यांसारख्या अनेक जातींची लागवड केली जाते. यात ब्लॅक राइसला विशेष मागणी आहे. शुगर, ब्लड प्रेशर (बीपी), कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड यांसारख्या आजारांसाठी हा काळा तांदूळ आरोग्यासाठी अनुकूल मानला जात असल्याने तो महागडा असूनही खरेदी केला जातो. बासमतीची लागवड या भागात तुलनात्मकरीत्या कमी होते.

पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील उत्पादकही आपला शेतमाल वणी येथील मिलमध्ये आणतात. येथील उत्पादित तांदळाला उत्तम मागणी असून पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, कळवण व सटाणा येथून ग्राहक खरेदीसाठी येतात. यामुळे वणी ही भात उत्पादकांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे.

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे, ऊस आणि टोमॅटो या पिकांऐवजी आता हळूहळू शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. हे पीक शेती व्यवसायाला निश्चित व पूरक उत्पन्न देणारे मानले जाते परंतु यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, तांदळाच्या दरात होणारी दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच फटका देणारी ठरण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT