नाशिक : इराण - इराक व अमेरिकेमधील युद्धाचा परिणाम आता स्वयंपाक गॅस वितरणावरही झाला असून, घरगुती ग्राहकांना सिलिंडर बुकिंगसाठी संबंधित वितरकांचा क्रमांक डायल केल्यावर तो लागत नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ करूनही बुकिंग मात्र थांबविले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होणार आहे. याबाबत व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली असून, शासनाला निवेदनही दिले जाणार आहे.
आखाती देशातील युद्ध परिस्थितीची झळ नाशिककरांनाही सोसावी लागत आहे. एकीकडे प्रशासन नाशिकमध्ये कोणतीही टंचाई नसल्याचे सांगत असताना केंद्र शासनाने मात्र रात्रीतून प्रतिसिलिंडर ६० रुपयांची वाढ केली आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरमध्ये ९० रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ करूनही बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांपुढे यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
ऑनलाइन बुकिंग क्रमांक लागेना शनिवारी सकाळपासून ऑनलाइन सिलिंडर बुकिंगसाठी घरगुती ग्राहक ऑनलाइन बुकिंग क्रमांक डायल करीत आहेत. मात्र फोन लगेच डिस्कनेक्ट होत आहे. काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार थेट फोन पे किंवा गुगल पे द्वारे ऑनलाइन बुकिंग मात्र होत आहे. परंतु बुकिंगला ३० दिवसांची प्रतीक्षा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्ह्यात कुठेही टंचाईची परिस्थिती नाही किंवा युद्धाचा परिणाम नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले आहे.
"सध्या टंचाईसारखी स्थिती नाही. अफवांमुळे चर्चांना उधाण येते. दरवाढ केंद्र शासनाकडून झाली आहे. मात्र ग्राहकांना त्रास होत असेल, तर त्याबाबत तपासून योग्य सूचना करणार."- सीमा अहिरे, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी पुरवठा अधिकारी
"व्यावसायिक सिलिंडरचे बुकिंग बंद केल्याने फूड मार्केट व हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होणार आहे. हॉटेलांना कुलूप लावण्याची वेळ येईल. शासनाने बुकिंग बंद न ठेवता किमान सिलिंडर मर्यादा प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांना ठरवून द्यावी, शासनाला हॉटेल व्यवसायातून टॅक्स व जीएसटी मिळतो. यात शासनाचाही तोटा होईल. संघटनेची लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल."- संजय चव्हाण, अध्यक्ष, आहार, नाशिक
आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल - डिझेल टंचाईची अफवा सध्या पसरविली जात आहे. मात्र नाशिकमध्ये तशी परिस्थिती नसून, कुठेही पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा नाहीत. वाहनधारकांना नेहमीप्रमाणे पेट्रोल -डिझेल उपलब्ध होत आहे. युद्धाचा आज तरी पेट्रोल-डिझेलवर परिणाम नसल्याचे चित्र आहे.