नाशिक : महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीमार्फत गेल्या शनिवारी हाती घेण्यात आलेल्या जुने गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्याने तीन दिवस निम्म्याहून अधिक नाशिकला पाणीबाणीचा सामना करावा लागला.
जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटे पुर्ण होत असतानाच निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रावरील जलवाहिनीत हवेचा दाब निर्माण झाल्याने पंचवटीसह पुर्व विभागातील काठे गल्ली भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, सायंकाळी उशिरा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे.
जलशुध्दीकरण केंद्रे तसेच जलवाहिन्यांच्या दुरूस्तीच्या कामांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शनिवारी (दि.२१) शटडाऊन घेण्यात आला होता. बारा बंगला ते निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्राला जोडणारी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथे लिकेज झाल्याने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काही तासांतच पुन्हा त्याच ठिकाणी ही जलवाहिनी लिकेज झाली.
त्यामुळे शनिवार (दि.21), रविवार (दि.22) पाठोपाठ सोमवारी देखील सिडको व इंदिरानगरचा काही भाग वगळता उर्वरित शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटेपर्यंत सुरू होते. परंतू, जलकुंभ भरण्यास विलंब झाल्याने सकाळचा पाणीपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंदच राहिला. अनेक भागात पाणी न आल्याने टॅंकरची मागणी नोंदविली गेली. विशेष करून गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला. तीन तास उशिराने पाणी सोडण्यात आले. जुने नाशिक भागात पाण्याची सर्वाधिक बोंब झाली. सिडको, इंदिरानगर भागात विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात आला. गोदावरी नदीवरील पुलावर नव्याने एअर व्हॉल्व टाकण्याचे कार्यवाही युध्द पातळीवर सुरू आहे. सद्य:स्थितीत सर्व जलशुध्दीकरण केंद्रावरुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असून निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रावरील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीत चाचणीनंतर हवेचा दाब निर्माण झाला. त्यामुळे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे हे केंद्र पुर्ण क्षमतेने चालले नाही. अवघे २५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा झाल्याने पंचवटीसह पुर्व विभागातील काठेगल्ली व परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
गेली तीन दिवस नागरीकांना पाणी पुरवठ्याबाबत जो त्रास झाला त्याबददल् महापालिकेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. शहरवासीय आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे.रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.