देवळा : कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा पाठलाग करुन आणि देवळ-मालेगाव मार्गावरील धोबीघाट शिवारात गोरक्षकांनी आठ जनावरांची सुटका केली. या कारवाईत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.१३) सकाळी साडे सहाच्या सुमारास करण्यात आली. देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देवळा-मालेगाव या राज्यमार्गावरील देवळ्याकडून मालेगावच्या दिशेने पिकअप (एमएच१४ जीयु ०८३७) वाहनात गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून आठ जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर आणि त्यांच्या साथीदारांना मिळाली. त्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी धोबीघाट शिवारात पाठलाग करून ते वाहना थांबवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार इंद्रजित बर्डे, प्रकाश शिंदे ,भास्कर सोनवणे यांनी सदर वाहनातून चार गायी व चार गोऱ्हे अशा एकूण आठ गोवंश जनावरांची सुटका केली. याप्रकरणी देवळा पोलिसांनी गोवंश जनावरांसह पिकअप असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात चालकाविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.