नाशिक: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देवदर्शनाला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत चोराला दोन धाडसी महिलांनी चांगलाच धडा शिकवला. नाशिकरोड परिसरात घडलेल्या या घटनेत, वृद्ध नणंद-भावजयीने आरडाओरड करत चोराचा पाठलाग केला आणि त्याला दुचाकीसह खाली पाडले. या झटापटीत घाबरलेला चोर दुचाकी आणि बॅग सोडून पळून गेला. विशेष म्हणजे, हा चोर तब्बल ७५ गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
नाशिकरोड येथील जयभवानी रोडवरील चव्हाण मळा परिसरात राहणाऱ्या वृद्ध नणंद-भावजय सोमवारी (दि.२८) सकाळी देवदर्शनासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी एका दुचाकीस्वाराने पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांच्याजवळ गाडी थांबवली. काही कळण्याच्या आतच त्याने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलांनी क्षणार्धात प्रसंगावधान दाखवत आरडाओरड सुरू केली आणि चोराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी थेट चोरावर झडप घालून त्याला दुचाकीसह खाली खेचले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे चोर घाबरला आणि आपली दुचाकी व बॅग घटनास्थळीच सोडून त्याने धूम ठोकली. हा संपूर्ण थरारक प्रसंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोराने मागे सोडलेली बॅग तपासली असता, त्यात आणखी दोन चोरीची मंगळसूत्र सापडली. यासोबतच, बॅगेत सापडलेल्या काही कागदपत्रांवरून पोलिसांनी चोराची ओळख पटवली. तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती आरोपी मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ७५ गुन्हे दाखल आहेत. तो एक सराईत आणि खतरनाक गुन्हेगार आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि बॅगेत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे उपनगर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. त्याच्या अटकेसाठी विविध पथके तयार करून ती रवाना करण्यात आली आहेत. या धाडसी नणंद-भावजयीच्या शौर्यामुळे एका मोठ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश झाला असून, त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.