नाशिक : 'शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांविरोधात शाळांनी सतर्क आणि जागरूक राहावे' या आशयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी हिंदी लादण्यावरून निवेदनही दिले.
'एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झाले. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितले की, हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल, तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती आली, तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहूच, अशा आशयाचे राज यांचे पत्र शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
---
---
फोटो सीटी १ ला मनसे पत्र नावाने सेव्ह आहे. (२० जून)
-----
-------०--------