नाशिक : गोदाघाटावरील पूर ओसरल्याने तीन दिवसांपासून पाण्याखाली असलेल्या दुतोंड्या मारुतीचे झालेले दर्शन.  (छायाचित्र : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Rain Update | गोदावरीचा पूर ओसरला, परिस्थिती पूर्वपदावर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सलग चार दिवस दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मंगळवारी (दि. २७) उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूरचा विसर्ग १२०४ क्यूसेकपर्यंत घटविण्यात आला. त्यामुळे गोदावरीचा पूर ओसरला आहे. गोदाघाटावरील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने गोदाकाठाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

त्र्यंबकेश्वर परिसर तसेच गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली. शनिवार (दि. २४) पासून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात गोदेला दुसऱ्यांदा पूर आला. मागील तीन दिवसांंपासून पुरामुळे गोदाकाठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मात्र, मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झाली, तर त्र्यंबकेश्वरमध्ये अधून-मधून हलक्या सरी बरसल्या. गंगापूर पाणलोट क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणाच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने कपात करण्यात आली.

गंगापूर धरणातून सध्या एक हजार २०४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. विसर्गात घट केल्यामुळे गोदाघाटावरील पूरस्थिती निवळण्यास सुरुवात झाली आहे. तीन दिवसांपासून पाण्याखाली असलेली मंदिरे दृष्टीस पडू लागली आहेत, तर पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने काठावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेनेही गोदाघाट परिसरातील वाहून आलेला गाळ उपसण्यास प्रारंभ केला आहे.

गोदामाई पाहुणी आली

जून व जुलै महिन्यात जेमतेम हजेरी लावणाऱ्या पावसाने चालू महिन्यात जिल्ह्याला झोडपून काढले. गोदावरी नदीला २० दिवसांत दुसऱ्यांदा पूर आला. तीन दिवसांनंतर पूरस्थिती निवळल्यानंतर मागे केवळ पुराच्या खुणा उरल्या आहेत. या परिस्थितीतून सावरताना काठावरील रहिवासी व व्यावसायिकांच्या मनी 'गोदामाई पाहूणी म्हणून आली' अशीच भावना आहे.

अन्य धरणांच्या विसर्गात घट

जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह तब्बल १८ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. पण, सलग चार दिवस झोडपणाऱ्या पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे गाैतमी-गोदावरी, करंजवणचा विसर्ग बंद करण्यात आला. दारणासह अन्य धरणांच्या विसर्गात कपात केली आहे. धरणांची दारे टप्प्याटप्प्याने बंद केली जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT