नाशिक : शहरासह जिल्ह्याला गुरुवारी (दि. १९) धुवाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला आहे. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत अतिवृष्टीने नार, पारसह अनेक नद्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क सुटला आहे.
ओझर येथे मासेमारी करताना ३६ वर्षीय युवक वाहून गेला. इगतपुरी तालुक्यात धरणांच्या पातळीत वाढ झाली असून, दारणातून ११०० क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर, दारणा, पालखेड, पुनद धरणांतूनही पाणी सोडले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी 118.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
शहरापाठोपाठ ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. गत २४ तासांत घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. पेठ तालुक्यात सर्वाधिक १२२, त्र्यंबकेश्वर ११७, सुरगाणा १०१, इगतपुरी ७२, दिंडोरी ६९, बागलाण ४५, नाशिक ४५, कळवण ३४, निफाड ३१, सिन्नर २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीत सुरगाण्यातील उदमाळ येथे शिमणू चौधरी यांच्या घराचे नुकसान झाले. ओझर येथील विठ्ठल शिंगाडे (३६) युवक चारी क्रमांक १६ येथे मासेमारी करीत होता. तो पाण्यात वाहून गेला असून, ओझर नगरपालिकेकडून त्याचा शोध सुरू आहे. दिंडोरी तालुक्यात धामण व कोलमण नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरण परिचालन सूचीनुसार पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात विसर्ग प्रवाहित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कादवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागातील पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर भागांत पावसामुळे दाणादाण उडवली. अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने गाव, पाड्यांचा संपर्क तुटला आहे. कमी उंचीच्या मोरीवरून पाणी वाहत असल्याने कामानिमित्त शेतात वा आसपास गेलेले ग्रामस्थही अडकून पडल्याचे वृत्त आहे. पावसामुळे कसारा घाटातील वाहतूक संथपणे सुरू आहे. पावसाचा जोर इतका आहे की, महामार्गावर दिवसाही दिवे लावून वाहनांना मार्गक्रमण करावे लागते. कळवण तालुक्यातील अर्जुनसागर (पुनद) धरण क्षेत्रात १६० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसामुळे धरणातील जलस्तर वाढल्याने अर्जुनसागर (पुनद) धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत असल्याने भोजापूर धरणात ४१ दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. निफाड तालुक्यात बाणगंगा नदीही दुथडी भरून वाहू लागली असून, यंदाच्या पावसाळ्यातील तिला पहिला पूर आला आहे. छोटे फरशी पूल पाण्याखाली गेल्याने काही वस्त्यांचा संपर्क तुटला आहे.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पुनद धरणातून १२०० क्यूसेक तर, दारणा धरणातून ११०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३२२८ क्यूसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.
इगतपुरी तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा पॉवर हाउसमधून सुमारे ११०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले.