पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले आहे.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Rain News | पावसाचे दमदार पुनरागमन; गंगापूर धरणामधून पुन्हा विसर्ग

गंगापूरमधून पुन्हा विसर्ग; सर्वदूर हजेरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्यात सर्वदूर सरी बरसत आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणातून दुपारी ३ पासून १,१०५ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गोदाघाटावरील छोटे-मोठे सांडवे पाण्याखाली गेले आहेत. (Rains have made a strong comeback in Nashik)

  • जिल्ह्यातील धरणे ९४.२२ टक्के भरली

  • उपयुक्त जलसाठा ६१,८७२ दलघफूवर

  • नऊ धरणे काठोकाठ

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत २७.२२ टक्के अधिक जलसाठा

ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने पाच दिवसांपासून उघडीप दिली. रविवारी (दि. १) मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले. नाशिक शहर व परिसरात सकाळी ११च्या सुमारास जोरदार सरी बरसल्या. तासभराच्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. तर गणेशोत्सवासाठी सजलेल्या बाजारपेठेत धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने पाण्याची आवक वाढली. त्यामुळे धरणातून बंद केलेला विसर्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. 'गंगापूर'मधून सध्या १ ,१०५ क्यूसेक विसर्ग कायम आहे. परिणामी, गोदाघाटावरील जनजीवन विस्कळीत झाले.

त्र्यंबकेश्वरमध्ये शेवटचा श्रावणी सोमवार, बैलपोळा तसेच पावसाचे आगमन असा एकत्रित योग जुळून आला. भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी अंगावर धारा झेलत आनंद लुटला. अल्पकाळाच्या विश्रांतीनंतर हजेरी लावलेल्या पावसामुळे भातशेतीला दिलासा मिळाला आहे. बळीराजा सुखावला आहे. तर पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत पावसाने जोरदार कमबॅक केले. तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा धरणातून २,०७१ क्यूसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग केला जातोय. तसेच भावली, भाम, वालदेवी आदी प्रकल्पांमधून विसर्ग केला जात आहे.

याव्यतिरिक्त पेठ, सुरगाणा, येवला, निफाड, दिंडोरी या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अन्य तालुक्यातही दिवसभरात अधुनमधून पडणाऱ्या हलक्या ते मध्यम सरींमुळे जनता सुखावली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत सरासरी तीन मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. तसेच यंदाच्या हंगामात एकूण ७४८ मिमी पर्जन्य झाले असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८० टक्के इतके हे प्रमाण आहे.

धरणांचा विसर्ग (क्यूसेक)

  • धरण - विसर्ग

  • गंगापूर -११०५

  • दारणा -२०७१

  • भावली - ७३

  • भाम - ३३०

  • वालदेवी -१८३

  • आळंदी -८७

  • पालखेड -१६९६

  • करंजवण -१५०५

  • वाघाड -३४३

  • तिसगाव -१०६

  • ओझरखेड -६८

  • नांदुरमध्यमेश्वर - ३१५५

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT