नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ४० गावांमधील ७ हजार १०८ शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून, त्यांची ४,९१४ हेक्टरवरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कांदा, सोयाबीन, मका, द्राक्ष, आणि डाळिंब यांसारख्या पिकांचा समावेश आहे.
या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून राज्य सरकारकडे ३ कोटी ५१ लाख ६७ हजारांच्या मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाल्यास त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाण्याचा वाढता प्रवाह पाहता, गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात ११३६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाचे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नाशिकमधील रामकुंड आणि गोदा घाट परिसरात पाणी पातळी वाढली असून, गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे. यामुळे नदीकाठचे रहिवासी आणि स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.