खेडगाव (नाशिक) : जिल्ह्यात गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याने दिंडाेरी, निफाड तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे वनस्पती आणि झाडे यांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश न मिळाल्याने तसेच अतिरिक्त आर्द्रतेचा द्राक्षवेलींवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
मे महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहेत. प्रारंभी अवकाळी पाऊस म्हणून शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने सुरू केलेला धडका जुलै महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरी सुरूच आहे. या पावसामुळे बहुतांश भागांत पेरण्यादेखील होऊ शकलेल्या नाहीत. शेतांमध्ये चिखल असल्याने शेतीची कामे करणे कठीण झाले आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्त पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसून असून, वेलींवर करपा आणि डाउनी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक द्राक्षबागांची पानेही खराब झाली असून, बागाच्या झाडाच्या वलांड्यावरतीमुळे फुटले आहेत. यातून येणाऱ्या काळात द्राक्ष उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरीराजा चिंतेत आहे.
संततधार पावसामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काही भागांमध्ये थोडीफार उघडीप मिळताच शेतकऱ्यांकडून महागडी औषधफवारणी करून कीड नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही वेळातच पुन्हा पाऊस कोसळत असल्याने महागडी औषधफवारणी करूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
शेतकरी द्राक्षबागा जतन करताना मुला-बाळाप्रमाणे काळजी घेतात. अगदी लागवडीपासून संगोपनासाठी खते, औषधी तसेच मशागतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले जातात. मात्र, नैसर्गिक संकटांपुढे शेतकरी हतबल होत आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले असून, लाखो रुपये खर्च करूनही अपेक्षित उत्पादन हातात मिळेल का नाही याची कोणतीही शाश्वती नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन निफाड आणि दिंडोरी तालुक्यात घेतले जाते. याशिवाय कळवण, येवला, देवळा आदी तालुक्यांतदेखील काही प्रमाणात द्राक्षबागा आहेत. यातील निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख उत्पादनाचा स्त्रोत द्राक्ष, कांदा हेच आहे. मात्र, सध्या अतिवृष्टीमुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या असून, शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. तसेच शेतात काम करणारे मजूर, कृषी सेवा केंद्रांची उलाढाल मंदावली आहे. शेतकऱ्यांसह सर्वच जण पाऊस उघडीप देण्याची वाट पाहत आहेत.