रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिल्ली येथे भेट घेतली file
नाशिक

नाशिक - पुणे रेल्वेचा डीपीआर अंतिम टप्प्यात, रेल्वेमंत्र्यांनी केलं खासदार वाजे यांना आश्वस्त

Nashik Pune Railway | लवकरच नवा डीपीआर तयार होणार, वर्षभरात कामास प्रारंभ करण्याचा खासदार राजाभाऊ वाजे यांचा मानस

गणेश सोनवणे

नाशिक पुढारी ऑनलाइन : नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी चौथ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ६ डिसें) झालेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खासदार वाजे यांना दिली.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाला मागील काही वर्षात अनेक अडचणी आल्या आणि प्रकल्प रखडला आहे. याबाबत खासदार पदी निवडून येताच राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्यात रेल्वे शिर्डी मार्गे होणार की संगमनेर मार्गे होणार असा प्रश्न होता. मात्र खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हा रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने होईल असे निश्चित करण्यात आले. दरम्यान, महारेलच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आराखड्यात (डीपीआर) नारायणगाव येथील 'जीएमआरटी' आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे चालवली जाणारी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ दुर्बिणी) या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पातून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाला लक्षात येताच त्याबाबत आता नव्याने आराखडा (डीपीआर) बनवण्याच्या कामाला खासदार राजभाऊ वाजे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीनंतर मान्यता देण्यात आली. नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्पाला वळसा घालून नव्याने रेल्वे मार्गाचा डीपीआर बनवला जात आहे. शुक्रवारी (दि. ६ डिसें.) रोजी झालेल्या बैठकीत नवा डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खासदार वाजे यांना दिली.

काय होती अडचण

महारेलने बनवलेल्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील 'जीएमआरटी' मधून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, नव्याने तयार होत असलेल्या डीपीआरमध्ये जीएमआरटीला वळसा दिला जाणार आहे. यामुळे किमान ६० ते ९० किमी अंतर वाढून अर्धा तासाचा वेळ वाढणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा देखील आग्रही

नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत तसेच जुन्याच मार्गाने मार्ग होण्याबाबत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील आग्रही आहेत. त्यामुळे याबाबत खासदार राजाभाऊ वाजे हे या दोन्ही नेत्यांना देखील लवकरच पत्राद्वारे किंवा समक्ष भेटून प्रकल्प लवकर सिद्धीस जाण्यासाठी वयक्तिक लक्ष घालावे अशी विनंती करणार आहेत.

काय म्हणाले रेल्वे मंत्री

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजभाऊ वाजे यांच्या बैठकीत मंत्री म्हणाले की, "या पंचवार्षिक काळात देशाला विकसित भारत म्हणून वाटचाल करायची आहे, त्यामुळे हा प्रकल्प देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू". दरम्यान, खासदार राजभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुरवठ्यामुळे ते देखील या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिरवा कंदील मिळावा : खासदार राजाभाऊ वाजे

पहिल्याच अधिवेशनापासून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने नाशिक पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. तसेच, त्यातील अडचणी कश्या दूर करता येतील ते देखील मंत्री वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेधनापर्यंत डीपीआर आणि इतर गोष्टीची पूर्तता होऊन या प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळावी असा निर्धार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक - पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा माझ्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. आता नव्याने बनवला जात असलेला डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशना पर्यंत याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन अंतिम मंजुरी मिळावी असा प्रयत्न करत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देखील विनंती करणार आहे.
खासदार राजाभाऊ वाजे (लोकसभा सदस्य, नाशिक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT