नाशिक : सुलभ शौचालयाच्या भिंतींवर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे छायाचित्र चिकटवून संभाजी ब्रिगेडने प्रतीकात्मक मूत्रविसर्जन आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणीही करण्यात आली.
पंचवटीतील गणेशवाडी येथे आयुर्वेदिक दवाखान्यासमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली असून, या संदर्भातील छायाचित्रे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या गुन्ह्यात कराड हा मुख्य आरोपी असून, माजी मंत्री मुंडे यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही सहआरोपी करून देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी ब्रिगडचे मार्गदर्शक हिरामण वाघ, नितीन रोठे-पाटील, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, सचिव अनिल आहेर, उपजिल्हाप्रमुख विकी गायधनी, बळी घडवजे, नितीन काळे, नीलेश गायकवाड, राकेश जगताप, प्रेम भालेराव, वैभव पवार आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. यावेळी कराड, मुंडे यांच्या प्रतिमा फाडण्यात आल्या. तसेच या प्रकरणातील फरार संशयित आरोपी कृष्णा आंधळे याच्या त्वरित मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही केली.