निफाड तालुक्यातील नैताळे गावातील नंदा प्रकारची बारवेचे चित्र पोस्टावर झळकत आहे. Pudhari News Network
नाशिक

Nashik | अभिमानास्पद ! पोस्ट पाकिटावर झळकले नैताळेतील ऐतिहासिक बारव

Lasalgaon । Nashik । जागतिक वारसादिन : निफाड तालुक्यातील नैताळे गावातील नंदा प्रकारची बारव

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव (नाशिक) : राकेश बोरा

जागतिक वारसादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील दोन ऐतिहासिक जलसाठ्यांच्या वारसास्थळांचा स्टॅम्प स्वरूपात गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरत आहे.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील नंदा प्रकारची बारव आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील शिवालय तीर्थ (पुष्करणी) यांचा समावेश करत टपाल पाकिटावर या वारसांचा ठसा उमटवला आहे.

निफाड तालुक्यातील नैताळे गावातील ही बारव 'नंदा प्रकारतील असून, ती एल आकाराची आणि भव्य स्वरूपाची आहे.

नैताळे गावातील ही बारव 'नंदा प्रकारतील असून, ती एल आकाराची आणि भव्य स्वरूपाची आहे. बारवेत एकाच बाजूने उतरण्याची सोय असून, आतमध्ये कमानीयुक्त झरोके, देवकोष्ठे आणि विविध खोल्यांचा समावेश आहे. ही बारव मराठा स्थापत्यशैलीचे सुंदर उदाहरण मानली जाते.

या बारवेचे बांधकाम शके १६६९ मध्ये मल्हारी प्रतापी मल्हारराव होळकर यांचे सेवक गंगोबा चंद्रचूड यांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या शुभदिनी केले होते. हा ऐतिहासिक ठसा आजही बारवेच्या रचनेत आणि सौंदर्यात दिसून येतो.

ऐतिहासिक जलसाठ्यांच्या वारसास्थळांचा स्टॅम्प स्वरूपात गौरव करण्यात आला आहे

या वारसाचा ठाव घेण्यासाठी मविप्रच्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. मेघा बुट्टे आणि प्रा. शर्मिष्ठा सुरजीवाले, लासलगाव येथील वारसाप्रेमी संजय बिरार यांचे योगदान उल्लेखनीय आहे. यांनी बारवेजवळ जाऊन सखोल दस्तऐवजीकरण केले आणि ड्रोनद्वारे छायाचित्रे टिपली. 'महाराष्ट्र बारव मोहीम' अंतर्गत आतापर्यंत २०२९ पारंपरिक जलसाठ्यांचे त्यात बारव, बावड्या, कुंड, पुष्करणी यांचे मॅपिंग गुगल मॅप्सवर करण्यात आले आहे. यामध्ये नैताळेची बारव एक महत्त्वाचा ठसा उमटवते. महाराष्ट्रातील बारवा विविध प्रकारांच्या असतात यात नंदा, भद्रा, जया आणि विजया या प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये 'नंदा बारव' सर्वाधिक आढळते. यांचा उपयोग प्राचीन काळात व्यापारीमार्ग, यात्रेचे रस्ते, घाटवाटा आणि दुष्काळी भागांतील जलसंधारणासाठी केला जात असे.

इतिहास, स्थापत्य, संस्कृती आणि जलपरंपरेचे प्रतीक असलेल्या या नैताळे गावाच्या बारवेचा गौरव आता देशभरातील टपाल पाकिटावर झळकणार आहे. हे खरोखरच गावासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT