नाशिक : उपसंचालक भुमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक व जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख नाशिक यांनी संपुर्ण जिल्हयात स्वामित्व योजने अंतर्गत नगर भूमापन योजना लागू करण्यात आलेल्या गावातील मिळकतीचे सनद वाटप मोहीम राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशान्वये शुक्रवारी (दि.27) दुपारी 12.30 वाजता जिल्हयातील 78 गावांमध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.
स्वामित्व योजेने अंतर्गत तयार झालेल्या प्रत्येक तालुक्यातील किमान पाच गावांमध्ये कार्यक्रम आयोजित करणे व तालुका आणि जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून तयारी सुरू आहे. यात, तालुकास्तरावर पंचायत समिती तर, प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. याशिवाय शासनाने दिलेल्या 78 गावांमध्ये देखील कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला आमदार, खासदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना आंमत्रित केले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर आयोजीत कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार असल्याने, त्यांची सर्व व्यवस्था केली जाणार आहे. कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत गटविकास अधिकारी यांना सूचना केल्याचे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी यावेळी सांगितले.
शेनवड खुर्द, फांगुलगव्हाण (इगतपुरी), डोंगरगाव, कांचणे, भावडे (देवळा), हिंगणवेढे, कोटमगाव, सांडगाव (नाशिक), बिजोरसे(बागलाण), पिंपळगाव जलाल (येवला), पायरपाडा, सराड (सुरगाणा), दातली, निमगांव, देवपूर (सिन्नर), चाकोरे, वाढोली, पाहिणे (त्र्यंबकेश्वर), बाडगा, हातरूंडा, डोमखडक (पेठ), अनकवाडे, शास्त्रीनगर, कसारी, (नांदगाव), दहयाने, पुरी, आसरखेडे, आडगाव, सोग्रस (चांदवड), चिल्हारपाडा,अहिंतवाडी, (दिंडोरी), कुंडाणे ओतुर, वडाणे वणी (कळवण) आदी गावे आहेत.