ठळक मुद्दे
चारचाकी वाहनांमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बागळून अवैधरित्या गर्भलिंग निदान
सोनोग्राफी यंत्राची विक्री करणाऱ्या जी ई हेल्थ केअर कंपनी सहआरोपी
सोनोग्राफी यंत्र विक्री करताना संबंधित कंपनीने मनपाची परवानगी घेणे बंधनकारक
नाशिक : चारचाकी वाहनांमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बागळून अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या चाळीसगाव येथील डॉ. बाळासाहेब नारायण पाटील याच्या विरोधात नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्ण निदान तंत्र अधिनियमातील तरतुदींन्वये गुन्हा दाखल केला आहे. विनापरवानगी सोनोग्राफी यंत्राची विक्री केल्याबद्दल यंत्र तयार करणाऱ्या जी ई हेल्थ केअर कंपनीला देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.
वडाळा-पाथर्डी रोडवर इंदिरानगर पोलिसांकडून सुरू असलेल्या वाहनांच्या तपासणी दरम्यान १७ मार्च २०२५ रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. या रस्त्यावरून जाणाऱ्या मारूती स्वीफ्ट (एमएच १९ डी व्ही १३७८)वर संशय आल्याने पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यांना एक पोर्टेबल यंत्र आढळून होते. सदर यंत्राची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता सोनोग्राफी यंत्र असल्याचे समोर आले. या यंत्राच्या माध्यमातून संबंधितांकडून गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने पोलिसांनी वाहनासह सोनोग्राफी यंत्र जप्त केले. सदर प्रकार नाशिक महापालिका हद्दीत घडल्याने पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. महापालिकेच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. वाहनाच्या क्रमांकावरून जळगाव आरटीओ कार्यालयातून वाहन मालकाची माहिती घेण्यात आली. या प्रकरणात सोनोग्राफीचे पोर्टेबल यंत्र विनापरवानगी बाळगणे, यंत्राची विनापरवाना वाहतुक करणे हे दोष सिद्ध झाले. त्यामुळे सदर वाहनासोबत आढळून आलेले चाळीसगाव येथील डॉ. बाळासाहेब नारायण पाटील यांच्याविरोधात गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमातील कलम ३, ६, १८, २३, २५, २६ व २९ अन्वये जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात सोनोग्राफी यंत्र विक्री करताना संबंधित कंपनीने मनपाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या प्रकरणात अशाप्रकारची परवनगी न घेता डॉ. पाटील यांना सोनोग्राफी यंत्र विक्री करण्यात आले होते. त्यामुळे सोनोग्राफी यंत्र तयार करणाऱ्या जी. ई. हेल्थ केअर या कंपनीला देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली आहे.
वाहनात पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र विनापरवाना बाळगल्याबद्दल तसेच विनापरवाना या यंत्राची वाहतुक केल्याप्रकरणी डॉ. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका.
डॉ. पाटील विरोधात पुण्यातही तक्रार
या प्रकरणात संशयित आरोपी डॉ. पाटील विरोधात पुण्यातही तक्रार दाखल झाली आहे. चाळीसगाव लगतच्या गावांमध्ये डॉ. पाटील हे रुग्णांना वाहनात बसवून अवैधरित्या गर्भलिंग निदान करत असल्याच्या तक्रारी पुण्यातील पीसीपीएनडीटी विभागाकडे दाखल असल्याचे मनपा मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकर यांनी सांगितले.
..तर पाच वर्षाची कैद होणार
मनपाच्या वैद्यकीय विभागाने डॉ. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता जिल्हा न्यायालयात खटला चालणार आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास डॉ. पाटील यांना पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता असून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही रद्द होऊ शकते.