नाशिकरोड : पालकांच्या कष्टांची सदैव जाणीव ठेवा, मोठे ध्येय ठेवले तरच उत्तुंग यश मिळते. यशस्वी व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा. मोबाइल व नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. केवळ इंजिनिअर, डॉक्टर न होता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून पालकांचे आणि देशाचा नावलौकिक वाढवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी यांनी केले.
नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा कुलथे मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ८० पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बैरागी यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्यासाठी फास्ट फूड टाळा. नियमित व्यायाम करून आजारांना दूर ठेवण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, दै 'पुढारी'चे वितरण व्यवस्थापक शरद धनवटे, राजेंद्र ट्रान्सपोर्टचे नाना कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून हा आगळावेगळा कौतुक सोहळा होत असून, तो राज्यात आदर्श ठरल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संयोजन संस्था उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, रवि भोसले, खजिनदार योगेश भट, सचिव गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, राज्य संघटनेचे विभागीय सचिव महेश कुलथे, ज्येष्ठ विक्रेते विजय सोनार, किशोर सोनवणे, भारत माळवे, इस्माईल पठाण, विकास राहाडे, अनिल कुलथे, वसंत घोडे, हर्षल ठोसर, रवि सोनवणे आदींनी केले. महेश कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. गौतम सोनवणे यांनी आभार मानले. वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेते प्रताप गांगुर्डे यांची कन्या संजना ही डॉक्टर, राजेंद्र थोरमिसे यांची कन्या सुप्रिया वकिल झाली तर विजय विसपुते यांची कन्या वृष्टीला दहावीत 95 टक्के गुण मिळाले आहेत. या तिन्ही लेकींचे यश त्यांंच्या पालकांसाठी अभिमानास्पद ठरले. त्यांंच्यासह 80 गुणवंत पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.