himgouri 
नाशिक

Nashik News | नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांवरून संताप! अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख अन् जखमींसाठी महापौरांकडून निधी

Nashik News | खड्डेग्रस्तांना मदत करण्यासाठी महापौर सहायता निधीची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असली, तरी त्यांचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची कबुली महापौर हिमगौरी आडके यांनी दिली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातातग्रस्त झालेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पुढील तीन महिन्यांसाठी महापौर सहायता निधी स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी करून सर्व संबंधित घटकांना एकत्र घेऊन समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्य नाशिककरांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी 'मी नाशिककर' या संकल्पनेअंतर्गत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी महापौरांच्या 'रामायण' निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी सभागृहनेते चंद्रकांत खोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. यावेळी महापौर आडके म्हणाल्या की, कुंभमेळ्याच्या कामांचे नियोजन प्रशासकीय स्तरावर करण्यात आले.

लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर महासभेत त्याची माहिती देण्यात आली. काही कामांना विलंब झाला असून, पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे वास्तव आहे. मात्र, तत्काळ रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून, निष्काळजी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.

कामाच्या नियोजनात प्रशासन कमी पडल्याचे मान्य असून, त्याबाबत जाब विचारण्यासाठी महासभा बोलवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौर विलास शिंदे यांनी नागरिकांनी मांडलेल्या सूचनांची सकारात्मक दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी करण गायकर, छबू नागरे आणि ॲड. अजिंक्य गिते यांनी 'मी नाशिककर'च्या वतीने भूमिका मांडली. देवेंद्र पाटील, प्रवीण जाधव, विनोद थोरात, सागर देशमुख आदी उपस्थित होते.

जखमींसाठी आर्थिक तरतूद

रस्ते अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महापौर सहायता निधीतून तरतूद करण्यात येणार आहे. तसेच कातकर कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः स्वीकारणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. पावसाळ्याच्या उर्वरित तीन महिन्यांत अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, हा या निधीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.


आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

महापौर आणि उपमहापौरांनी नागरिकांसोबत असल्याचे आश्वासन दिले असले, तरी सध्याच्या प्रशासकीय कारभारावर अविश्वास व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर 'मी नाशिककर'चे पदाधिकारी ठाम राहिले. बैठकीनंतर आंदोलनाचे स्वरूप निश्चित करण्यात येणार असून, मानवी साखळीच्या माध्यमातून आंदोलन करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच आयुक्तांची बदली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती या प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याचे ॲड. अजिंक्य गिते यांनी सांगितले.

"निर्माण झालेल्या समस्येवर सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढणे आवश्यक आहे. नाशिककरांच्या सुरक्षतेलाच भावना हीच आमची प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कोणतीही कमतरता राहू देणार नाही. खड्ड्यांना जबाबदार असलेल्या 'एमएनजीएल'वरही योग्य ती कारवाई केली जाईल."
- हिमगौरी आहेर-आडके, महापौर

'खड्डेमय रस्त्यांची चौकशी करा' विशेष जनता दरबाराची मागणी

शहरातील रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची एफआयआर नोंदवून सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. गोविंद बोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये विशेष जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात, अशीही विनंती त्यांनी केली आहे. बोडके यांनी नमूद केले आहे की, २०२६ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.

यावरून खड्डे पडल्याने नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, या संपूर्ण प्रकरणाची एफआयआरद्वारे चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच शासनाचे आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करून त्यांची संपत्ती जप्त करावी आणि भविष्यात दर्जेदार रस्त्यांसाठी पारदर्शक यंत्रणा उभी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

नाशिकरोडच्या खड्ड्यांवरून महापालिका प्रशासन धारेवर

सततच्या पावसामुळे नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्यामोठ्या खड्ड्यांमुळे वाढते अपघात, उड्डाणपुलावरील रखडलेली दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून नाशिकरोड मनपा प्रभाग समितीची सभा चांगलीच गाजली. विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली.

अनेक प्रश्नांना अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरे नसल्याने सभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सभापती रमेश धोंगडे यांनी संबंधित कामांची माहिती देत अधिकाऱ्यांची बाजू मांडली. प्रभाग समिती सभेच्या सुरुवातीला अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित पवार यांच्या कामकाजावर आक्षेप घेत शरद मोरे व प्रशांत दिवे यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रुचिस साळवे यांनी नाशिकरोडमधील खड्ड्यांसह स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या रखडलेल्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. डिसेंबर २०२५ मध्ये कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) निघूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यास भारती जाधवर यांनीही समर्थन देत प्रशासनावर टीका केली.

योगेश भोर यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील खड्ड्यांची दुरुस्ती अधोरेखित करत, विभागीय अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही महिनाभर कोणतीही दुरुस्ती न झाल्याचा आरोप केला. त्यांनी संतप्त होत खड्ड्यांचे छायाचित्रे सभागृहात फेकून निषेध नोंदविला. यावर सभापती रमेश धोंगडे यांनी खड्डे बुजवण्यासाठी नवीन साहित्य उपलब्ध झाले असून, सर्व प्रभागांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले.


योगेश गाडेकर यांनी प्रभाग १९ व २२ मधील पाणीपुरवठा, बिटको रुग्णालय, सार्वजनिक शौचालये, पथदीप, स्वच्छता व इतर नागरी सुविधांकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप केला. प्रमिला मेड यांनी अनेक भागांत नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने स्वतःच्या खर्चाने पाणी आणावे लागत असल्याचे सांगितले.


प्रभागात वाढलेल्या डासांच्या उपद्रवाबाबत सुनीता भोजने यांनी धूर फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केला. तर श्वेता भोसरी यांनी मोडकळीस आलेल्या धोकादायक बांधकामांवर कारवाईची मागणी केली. अतिक्रमण विभागासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करण्याचाही मुद्दा सभेने मांडला. सभेला नगरसेवक शैलेंद्र दगे, सतीश निकम, रंजना बोराडे, मंगला आढाव, जयश्री गायकवाड, वैशाली दाणी, संजीवनी हांडगे यांच्यासह विभागीय अधिकारी प्रविण त्रिमुखे आणि नगरसचिव संजय नेरकर उपस्थित होते.


खड्ड्यांचे फोटो फेकून निषेध

प्रभाग क्रमांक १५ मधील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत संतप्त नगरसेवक योगेश भोर यांनी खड्ड्यांचे छायाचित्रे सभागृहात फेकून प्रशासनाचा निषेध केला. तातडीने दुरुस्ती न झाल्यास शिवसेना शैलीत तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT