मालेगाव (नाशिक): एक हुकमी नगदी पीक समजल्या जाणार्या डाळिंब पिकावर तेलकट डाग, मर रोग, सुत्रकृमी, खोडकिड, शॉटहोल बोरर या कीड रोगामुळे मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील एकूण 11 हजार 605 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
परिणामी डाळिंब बाग क्षेत्रात घट झाली आहे. यावर डाळिंब पीक संशोधन केंद्राने उपाय योजना सुचविण्याची मागणी डाळिंब उत्पादकांकडून केली जात आहे. प्रारंभी फायद्याची ही डाळिंब शेती आता खर्चिक होत चालली आहे. निसर्गाचे दुष्टचक्र व रोगराईत महागडी औषध फवारणी, खते, मजुरी, शेणखत टाकून बागा जगवाव्या लागत आहेत. सध्या डाळिंब बागांवर मर व तेल्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्व प्रकारच्या प्रयत्नांनंतरही रोगाला अटकाव होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील डाळिंब बागा अखेरच्या घटका मोजत आहेत. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यात फलोत्पादन योजना राबवून कष्टकरी शेतकर्यांना बागायती शेतीसाठी प्रोत्साहित केले होते. या संधीचा पुरेपूर फायदा घेत शेतकर्यांनी कमी पाण्यावर येणार्या डाळिंबबागा फुलविल्या. फलोत्पादन योजनेमुळे उजाड माळराने व गावोगावची शिवारे लालबुंद डाळिंबांनी डोलू लागली. बळीराजाच्या संसाराला आकार आला. नंतरच्या काळात डाळिंबाच्या आरक्ता, मृदुला, शेंदर्या व भगवा या जाती विकसित झाल्या. त्यांची लागवड हजारो एकर क्षेत्रात झाली. लागवडीचे क्षेत्र जसे वाढले तसेच रोगराईचे प्रमाणही वाढले. परंतु, त्यावर प्रभावी नियंत्रण होऊ शकले नाही. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढून उत्पन्न घटत गेले, आता तर उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
भारी जमिनीत व कमी अंतरावर डाळिंबलागवड, खुल्या पद्धतीने पाणी देणे यामुळे मर व तेल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. शास्त्रोक्त पद्धतीने बहार छाटणीचा अभाव या सगळ्या गोष्टी डाळिंब क्षेत्र कमी होण्यास कारणीभूत ठरल्या. - भगवान बोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव
वर्ष (लागवड क्षेत्रफळ हेक्टरमध्ये)
2019-20 ( 37,673)
2020-21 ( 38,472)
2021-22 (39,263)
2022-23 ( 31,766)
2023-24 ( 26,058)
सध्याच्या स्थितीत डाळिंब बागा जगवणे खर्चिक बाब झाली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. छाटणी, खते, रासायनिक औषधे, वारणी, निंदणी यावरच बेसुमार खर्च होत आहे. - समाधान पाटील, डाळिंब उत्पादक