नाशिक : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीदपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे आता स्पष्ट झाले आहे. 'दत्तक पित्या'ची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्यामुळे नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर निओ मेट्रोसह आयटी हब, लॉजिस्टीक पार्क, डबलडेकर उड्डाणपुल या प्रकल्पांचा मार्ग सुकर होणार असल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी नाशिकला दत्तक घेत असल्याचे विधान केले होते. नाशिककरांनी देखील फडणवीस यांच्या सादेला प्रतिसाद देत शहर विकासाच्या नावावर भाजपच्या हाती महापालिकेची एकहाती सत्ता दिली. भाजप सत्तेवर येताच फडणवीस यांनी निओ मेट्रोच्या रुपाने देशातील पहिली टायरबेस मेट्रो नाशिकला सुरू करण्याची घोषणा केली. त्यासाठी महारेल आणि सिडकोमार्फत सर्वेक्षणही केले गेले. मेट्रो निओचे मार्ग, त्यासाठी लागणारा निधी यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत मंजूरी देत राज्य शासनामार्फत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र या घोषणेला आता सात वर्षांचा कालावधी उलटला तरी निओ मेट्रोला केंद्राकडून हिरवा कंदिल मिळू शकलेला नाही. महापालिकेतील भाजपच्या गत सत्ताकाळात आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव पुढे आला. केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आयटी परिषदही घेण्यात आली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी लॉजिस्टीक पार्कला तत्वत: मंजुरीही दिली. त्यानंतर मात्र या दोन्ही प्रकल्पांना पुढे चालना मिळू शकलेली नाही. मध्यंतरी नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान डबल डेकर उड्डाणपुल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र त्याचीही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मुंबई, पुण्याच्या सुवर्णत्रिकोणातील शहर म्हणून नाशिकची ओळख असली तरी नाशिकला विकासाच्या बाबतीत तितकेसे महत्व मिळू शकलेले नाही. आता नाशिकचा दत्तक पिता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्यामुळे नाशिकच्या प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
येत्या २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. नाशिकच्या सिंहस्थासाठी महापालिकेने सुमारे सात हजार कोटींचा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रचारसभेत फडणवीस यांनी सिंहस्थासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या परिपूर्तीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.