नाशिक : शिवसेनेच्या वर्धापनीदिनी ज्येष्ठांच्या आरोग्य तपासणीप्रसंगी उपस्थित ठाकरे गटाचे डी. जी. सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, प्रताप मेहरोलिया आदी. Pudhari News Network
नाशिक

Nashik Politics | शिवसेना वर्धापनदिनीही ठाकरे-शिंदे गटात चढाओढ

विविध कार्यक्रमांमधून एकमेकांविरोधात रंगली स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक शहरात ठाकरे गट तसेच शिंदे गटात मोठी चढाओढ दिसून आली. ठाकरे गटातर्फे गुरुवारी (दि. १९) दिवसभर गुणवंत विद्यार्थी सत्कार, पॅथेलॅबचे उद्घाटन, जंतुनाशक धूरफवारणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तर शिंदे गटातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा, शालेय साहित्य वाटप, आधारकार्ड शिबिर, रक्तदान शिबिर, रोजगार मेळावे आदी कार्यक्रमांचे रेलचेल, असा भगवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

ठाकरे गटातर्फे समाजोपयोगी उपक्रम

ठाकरे गटातर्फे गुरुवारी दिवसभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देवळाली गाव येथे सत्यनारायण पूजा, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, पाथर्डी गावातील मारुती मंदिरात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व लाडू वाटप, पाथर्डी फाटा येथील वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप, सातपूरच्या ईएसआयसी रुग्णालयात फळेवाटप, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्या सिडकोतील शुभम पार्क येथील संपर्क कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर, मोरवाडी रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. सातपूरच्या प्रगती शाळेत साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव, जंतुनाशक धूरफवारणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, वसंत गिते, योगेश घोलप, कोअर कमिटी सदस्य केशव पोरजे, भारती ताजनपुरे, लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक, उपजिल्हाप्रमुख अस्लम मणियार आदी उपस्थित होते.

नाशिक : शिवसेनेच्या वर्धापनीदिनी गंगापूर रोड येथील जोशीवाडा येथे छत्रीवाटप करताना शिंदे गटाचे रोशन शिंदे, आनंद फरताळे, आदित्य बोरस्ते आदी.

शिंदे गटातर्फे भगवा पंधरवडा

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे गटातर्फे भगवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी व स्लम परिसरातील नागरिकांसाठी छत्री वाटप, इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके तसेच शालेय साहित्य वाटप, बेरोजगार तरुणांसाठी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देणारे रोजगार मिळावे, नागरिकांच्या सर्वस्वी उपयोगात येणारे आधारकार्ड शिबिर, रक्तदान शिबिर असे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन प्रभागनिहाय करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. प्रभागनिहाय शिवसेना सदस्य नोंदणी अभियानदेखील राबवण्यात येणार असून, शिवसेना व संलग्न संघटनेच्या विविध शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहेत. गुरुवारी प्रभाग क्रमांक ७ च्या वतीने गंगापूर रोड येथील जोशीवाडा येथे छत्रीवाटप करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, युवा सेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT